आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apulaki Connecting Souls Adopted Adharasram In Nashik

आधाराश्रमातील बालकांना ‘आपुलकी’ची हाक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कधीतरी वेळ काढून आधाराश्रमात वेळ देणे आणि संपूर्ण आधाराश्रमाचे पालकत्व स्वीकारणे यामध्ये प्रचंड तफावत आहे. नाशिकच्या काही हौशी स्वयंसेवकांच्या ‘आपुलकी - कनेक्टिंग सोल्स’ या तुकडीने कळवण तालुक्यातील कनाशी येथील आधाराश्रम दत्तक घेतले आहे. तब्बल १७५ विद्यार्थ्यांचे पालकत्व यांनी स्वीकारले आहे.

या आश्रमातील विद्यार्थ्यांची जीवनशैली गुणवत्तापूर्ण बनविण्याचा विडा या तुकडीने उचलला आहे. नाशिकमधील विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी आश्रमामध्ये पुढे करावयाच्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी या व्यक्ती भेटत असतात. या दिवशी होणाऱ्या नियोजनाप्रमाणे सुटीच्या दिवशी कनाशीला जाऊन प्रत्यक्ष काम करत असतात. गेल्या रविवारी कनाशी आश्रमामध्ये डॉक्टरांची एक तुकडी नेऊन मुलांचे वजन, उंची, रक्तगट आणि त्यांच्या आवडी-निवडींची नोंद करून घेतली. मुलांच्या वागणुकीवरून त्यांच्या पुढील शिक्षणाचा आलेख ठरविला जाणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून हे विद्यार्थी सर्वार्थाने वंचित राहातात, त्यांच्या शिक्षणाला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ‘आपुलकी’चे काम सुरू आहे. याचबरोबर त्यांना परिपूर्ण नागरिक घडविण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरजेच्या गोष्टीही वेळ काढून ही लोकं त्यांना शिकवणार आहेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्वकमाईचा ठराविक हिस्सा या मुलांसाठी बाजूला काढत त्यांनी काम उभे केले आहे. काम करताना कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा ठेवता सातत्याने मुलांच्या संगोपनासाठी सुरू असलेले हे काम स्तुत्य म्हणावे लागेल. येत्या काही महिन्यांमध्ये या ग्रुपतर्फे मुलांना शैक्षणिक विषयांमध्ये मदत करण्यासाठी त्या-त्या विषयातील पारंगत व्यक्ती तासिका घेण्यासाठी जाणार आहेत. आपल्या परीने जमेल तितकी मदत करणाऱ्या या व्यक्तींमध्ये काही डॉक्टर्स, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खासगी संस्थांचे कर्मचारी, व्यावसायिक यांसारख्या लोकांचा समावेश आहे.
नेत्रतपासणीसाठी डॉक्टरांचे योगदान..
या मुलांच्या डोळे तपासणीसाठी गेल्या रविवारी रूपेश वाघ यांनी सहकार्य केले. रक्त तपासणीसाठी विद्या निरभवणे आणि विशाल यांनी सहकार्य केले, तर शाल्मली फडणीस, डॉ. विक्रांत वैदेही मुंगी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.
शैक्षणिक प्रकल्पांना चालना मिळणार
मुलांसाठी अनेक शैक्षणिक योजना राबविल्या जातात, पण आश्रमशाळांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. त्या पोहोचवण्यासाठी ‘आपुलकी’ काम करणार आहे. मुलांच्या हातखंड्याचे विषय लक्षात घेऊन यावर तज्ज्ञ व्यक्तींची तुकडी काम करणार आहे.
नामोल्लेख नको, काम महत्त्वाचे...
आधाराश्रमाला मदत करणाऱ्या या व्यक्तींना ग्रुपविषयी अधिक माहिती विचारली असता, आमच्या कोणाचीच नावे बातमीमध्ये यायला नकोत, असे सांगण्यात आले. याचे कारण विचारल्यावर आलेली प्रतिक्रिया खरोखर स्तुत्य होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेक पारंगत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्यांना नावासाठी नाही तर मुलांच्या हितासाठी काम करायचे आहे. त्यामुळे ज्यांना ‘आपुलकी’विषयी जाणून घ्यायचे आहे किंवा संपर्क साधायचा आहे त्यांनी फेसबुकवरील ‘दे शुल्ड सेलिब्रेट’ हे पेज आवर्जून पाहावे, असे सांगितले गेले.