आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्किटेक्चरसाठी व्यावसायिकता अनिवार्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केवळ पदवी घेऊन बाहेर पडणा-या स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांची व्यवसायपूरक गुणवत्ता तपासण्यासाठी लवकरच राष्‍ट्रीय पातळीवर परीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भात कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट्सने प्रस्ताव संमत केला असून, केंद्र सरकारकडे पाठविला आहे, अशी माहिती कौन्सिलचे राष्‍ट्रीय अध्यक्ष प्रा. उदय गडकरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
प्रा. गडकरी म्हणाले, देशात स्थापत्यशास्त्राची 300हून अधिक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांतून बाहेर पडणारा विद्यार्थी व्यवसाय करण्यास सक्षम असावा, यासाठी ही परीक्षा राबविण्याच्या विचारात आम्ही आहोत. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, हा प्रस्ताव लवकरच अधिकृतपणे संमत होईल.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आम्ही या प्रस्तावावर काम करत होतो. या परीक्षेचे स्वरूपही निश्चित झाले असून, पुण्याच्या निआसा (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अ‍ॅडव्हान्स स्टडीज) मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायात उतरता येणार नसल्याने नुकसान टळणार आहे. या परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थीच व्यवसाय करण्यास पात्र ठरणार आहेत.
दरी मिटविण्याचा प्रयत्न
मी कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट्सचा अध्यक्ष असतानाच्या कार्यकाळातच या प्रस्तावावर विचार सुरू होता. या परीक्षेमुळे व्यवसायास पात्र विद्यार्थीच काम करू शकतील. अपात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याचा पर्याय अवलंबिता येईल. पुस्तकी शिक्षण आणि व्यवसायामधली दरी मिटवण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे.
प्रा. विजय सोहोनी, संचालक, आयडिया स्थापत्यशास्त्र महाविद्यालय, नाशिक