नाशिक- वास्तुनिर्मितीसाठी नवनवीन कल्पना आणि डिझाइन्स साकारताना तब्बल 40 वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या महाराष्टातील नामवंत वास्तुविशारदांनी यादवकालीन गोंदेश्वर मंदिरास भेट दिली. हेमाडपंती शिल्पकलेतील अद्भुत सौंदर्यानुभूती घेताना ते भारावून गेले.
दगडी चौथ-यावर उभारण्यात आलेले शिवपंचायतन पद्धतीचे पाच मंदिरांचे संकुल, त्यावरील नाजूक कोरीवकामातल्या रेखीव मूर्ती, महाभारत व उपनिषद-पुराणातील विविध प्रसंगांचे चित्रण, शिल्पाकृतींच्या अवयवातील प्रमाणबद्धता, देखणेपण व मोजमापातील बिनचूक स्केल या सर्वच गोष्टी सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या कशा साध्य झाल्या असतील, याचा विचार करत वास्तुविशारदांनी शिल्पकलेचे कौतुकही केले.
भारतीय कलाप्रसारणी सभेतील आर्किटेक्ट
नाशिक येथील अरुण काबरे, रमेश चौधरी, दीपक देवरे व चंद्रकांत धामणे हे नामवंत वास्तुविशारद पुणे येथील भारतीय कलाप्रसारणी सभा या आर्किटेक्ट कॉलेजचे 1965-71 या काळातले विद्यार्थी. या गु्रपमधील सुमारे 35 जणांनी आपला गट बनवला असून, दरवर्षी एकत्र येऊन संमेलन साजरे केले जाते. यापूर्वी महाबळेश्वर, पुणे अशा अनेक ठिकाणी ही संमेलने झाली आहेत. यंदाच्या दोनदिवसीय संमेलनाची जबाबदारी नाशिक येथील, काबरे, चौधरी, देवरे, धामणे यांनी घेतली असून, यासाठी यादवकालीन इतिहासाचा वारसा व शिल्पकलेची समृद्धी असलेल्या सिन्नरची निवड केली आहे. पंचवटी सिन्नर मोटेल्स येथे आयोजित शिबिरास बंगळुरूसह महाराष्टात विविध ठिकाणी आर्किटेक्ट म्हणून नावलौकिक मिळविलेले 35 सभासद उपस्थित होते.
अनास्थेविषयी दु:ख व्यक्त
सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या सिन्नरमधील यादवकालीन वास्तूंची जपवणूक करण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. शासकीय स्तरावर मोठी अनास्था असून, स्थानिक नागरिक-नगरपालिका किंवा सामाजिक संस्थांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न न केल्याची खंत या वास्तुविशारदांनी व्यक्त केली. शिर्डी व पुणे मार्गावरील गोंदेश्वर मंदिर भाविक व पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र होऊ शकेल, त्यासाठी जनजागृती करण्याच्या भावनाही या वेळी व्यक्त झाल्या.
पक्षी निरीक्षणाविषयी मार्गदर्शन
पंचवटी मोटेल्सच्या मंत्रालय हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बंगळुरू येथील आर्किटेक्ट व पक्षीमित्र गोपीनाथ सुब्बाराव यांनी भारतातील पक्ष्यांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, अधिवासाची ठिकाणे, जगाच्या कानाकोप-यातून येणारे पक्षी, त्यांचा हजारो मैलांचा प्रवास, निवासाची ठिकाणे यांबाबतची सखोल माहिती स्लाइड शोद्वारे दाखवली.