आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड- गेल्या दोन दिवसांपासून उपाशीपोटी रस्त्याकडेला दिवस-रात्र काढणार्या विदर्भातील तीन युवकांना अन्न, पाणी देतानाच थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅँकेट देत एका लष्करी अधिकार्याने माणुसकीचे दर्शन घडविले.
सोमवारी (दि. 24) भरतीसाठी आलेले उमेदवार निवड चाचणीत यशस्वी ठरले. मात्र, अभूतपूर्व गर्दीमुळे गोंधळ उडाला व त्या धावपळीत विदर्भातील तिघा उमेदवारांची बॅग गहाळ झाल्याने त्यांचे कपडे, पैशांचे पाकीट व अन्य साहित्य गहाळ झाले. त्यामुळे तिघांची पैशाअभावी खाण्यापिण्यासाठी वणवण सुरू झाली व तशाच अवस्थेत दोन दिवस ते उपाशीपोटी टीए 116 पॅराबटालियनच्या गेटजवळ बसून होते. वैद्यकीय तपासणी होणार असल्याने त्यांचा नाईलाज होता. गुरुवारी कार्यालयातून बाहेर पडणार्या लष्कराच्या अधिकार्याचे या तिघा तरुणांकडे लक्ष गेले. त्यांची विचारपूस केल्यानंतर तरुणांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी अधिकार्याला सर्व हकीकत सांगितल्यावर अधिकार्याने तातडीने एका जवानाला सांगून त्यांची जेवणाची व्यवस्था केलीच, शिवाय घरातील ब्लॅँकेट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
देवळाली कॅम्पला सुरू असलेल्या लष्कराच्या भरतीत दोन दिवसात जवळपास दोन हजार उमेदवारांची प्राथमिक चाचणीत निवड झाली. प्रादेशिक सेनेच्या टीए 116 पॅरा बटालियनची विविध पदासाठी टीए मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे.
भरतीच्या तिसर्या दिवशी गुरुवारी डिप्लोमा व क्लर्क पदासाठी राज्यभरातील सुमारे 500 विद्यार्थी देवळाली कॅम्पला दाखल झाले होते. त्यांना आनंदरोड, बुचडे मैदानावरून टप्प्याटप्प्याने टीए मैदानावर सोडण्यात आले. सकाळी 6 वाजेपासून विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. तीन दिवसातील दोन हजार उत्तीर्ण उमेदवारांपैकी एक हजार उमेदवारांची काल वैद्यकीय चाचणी झाली. रविवारपर्यंत (दि. 29) ही भरती प्रक्रिया चालणार असून, शुक्रवारी (दि. 27) ट्रेडमन व क्लर्क पदासाठी निवड चाचणी होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.