आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी नोकरदारांकडून कागदपत्रांची जमवाजमव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: सन 2011-12 या आर्थिक वर्षाकरिता नोकरदार करदात्यांसाठी आयकर (उत्पन्न कर) कपातीची मुदत जवळ येत असल्याने कर वाचवण्यासाठी करदात्यांची लगबग सुरू आहे. शहरातील चार्टर्ड अकाउंट्स संस्था आणि विविध खासगी कार्यालयांतून नोकरदारांच्या करबचतीसंदर्भातील माहितीची मागणी होत असून, करपात्र नोकरदारांची कर वाचवण्यासाठी कागदपत्रे जमवाजमव सुरू आहे.
31 मार्चपूर्वी व्यापार्‍यांसाठी आगाऊ कर तसेच नोकरदारांसाठी टीडीएसचा भरणा करणे आवश्यक असते अन्यथा कलम 234 ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अंतर्गत, व्याजाची आकारणी होते आणि मोठय़ा रकमेच्या करदात्यांसाठी हे व्याज वार्षिक सरासरी 12 ते 18 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
आणखीही सवलती
कोणत्याही करदात्याने 31 मार्चपूर्वी कर सल्लागाराकडून योग्य सल्ला घेतल्यास चांगल्या प्रकारे करबचतीचा लाभ घेता येईल. 80 सी कलमांतर्गत आणखी करबचत साधली जाऊ शकते, त्यासाठी तांत्रिक सल्ला महत्त्वाचा आहे. विक्रांत कुलकर्णी, सी.ए.
अशी मिळेल कर सवलत
चालू आर्थिक वर्ष 2011-12मध्ये कलम 80 सी अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुमचा कर काही प्रमाणात वाचू शकतो. इन्कम टॅक्स अँक्ट, 1961च्या कलम 80 सी अंतर्गत, जास्तीतजास्त एक लाख रुपयांची करसवलत मिळू शकते. उदाहरणार्थ तुमचे उत्पन्न पाच लाख रुपये असेल तर तुमचे करपात्र उत्पन्न चार लाख रुपये असेल व त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल.
असे आहेत करमुक्त उत्पन्नाचे स्लॅब
> स्त्रियांकरिता - 1,90,000 रुपये
> ज्येष्ठांकरिता (वय वर्ष 60 ते 80) - 2,40,000 रुपये
> अतिवरिष्ठ ज्येष्ठांकरिता (80 वर्षांवरील) - 5 लाख रुपये.
> इतरांकरिता - 1,80,000 रुपये.
खालील नमूद केलेल्या एका किंवा एकापेक्षा जास्त योजनांमध्ये मिळून एक लाखापर्यंत गुंतवणूक केल्यास 80 सी अन्वये करसवलत मिळते.
गुंतवणूक पर्याय प्रकार
टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड विशिष्ट इक्विटी आधारित बचत योजना
गृहकर्ज कोणतेही खरेदी केलेल्या किंवा बांधलेल्या घरासाठी भरलेली मुद्दल
जीवन विमा जीवनविमा योजनेसाठी भरलेले हप्ते
शिक्षण शुल्क जास्तीतजास्त दोन मुलांसाठी. (शाळा अगर कॉलेज अगर इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत भरलेले शिक्षण शुल्क
स्मॉल सेव्हिंग स्किम राष्ट्रीय बचतपत्रे, पोस्टाच्या बचत योजना, बॅँक ठेवी आणि ज्येष्ठांसाठी बचत योजना
प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ तसेच पगारातून वजा होणारा प्रोव्हिडंट फंड
बॅँक मुदत ठेवी राष्ट्रीयीकृत तसेच शेड्युल्ड बॅँकांमध्ये केलेल्या करबचत मुदत ठेवी.
विशिष्ट सरकारी योजना नाबार्ड तसेच एनएचबीमधील करबचत मुदत ठेवी.
वरील योजनांकरिता कलम 80 सी अन्वये सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षांचा लॉक-इन -पिरीयड असतो. तसेच आयकर कलम 80 सीसीएफ अन्वये केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील बॉँडस्मधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर 20 हजार रुपयांचा अतिरिक्त करबचत लाभ मिळतो. हा लाभ नियमित मिळणार्‍या 80 सी कलमाखालील 100000 रुपयांपेक्षा वेगळा आहे.