आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतबल राजा, असह्य सैनिक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालेकिल्ल्यावरील अाक्रमणे थांबत नाही. नवनिर्माणाचे हुकूमी अस्त्र निष्प्रभ ठरले अाहे. सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्यानिमित्ताने रंगणाऱ्या युद्धासाठी हे अस्त्र घासूनपुसून सज्ज करण्याचीही खुद्द राजाचीच मानसिकता दिसत नाही. सैन्याचे मनाेबल वाढवण्यासाठी नवनवीन सेनापती बदलण्याचे सत्र संपलेले नाही. अशा यादवीचा सामना सध्या महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील शिलेदार करीत अाहेत. खुद्द राजाच हतबल असल्यामुळे सैनिकांच्याही पदरात असह्यतेपलीकडे पडणार काय हाही अंतर्मुख हाेण्यागत प्रश्नच अाहे.
नवनिर्माणाचा नारा देत नऊ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झंझावत करणाऱ्या मनसेची अवस्था अलीकडेच शाेचनीय झाली अाहे. या पक्षामागील पडझडीचे शुक्लकाष्ट काही केल्या थांबलेले नाही. किंबहुना दिवसागणिक या पक्षाचे बालेकिल्ल्यातील एक एक चिरे निखळून पडण्याचे प्रमाण वाढतच चालले अाहे. या सर्वाला नेमके जबाबदार काेण यावरून खलही थांबलेला नाही. गेल्या अाठवड्यात मनसेचे सर्वसर्वा राज ठाकरे यांनी अापल्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख मर्जी असलेल्या बाळा नांदगावकर या सेनापतीला नाशिकच्या गढीवर पाठवले. नांदगावकर यांनी गढीवरील सर्व शिलेदारांना गाेळा करून फाटाफुटीला जबाबदार काेण यावर बरीच खलबते केली. शिलेदारांशी केलेल्या कानगाेष्टींचा अहवाल एव्हाना राज यांच्या दरबारी सादरही झाला असेल, मात्र या पद्धतीने चाली करून राज हे सैन्याला वा सेनापतींना एकसंघ ठेवणार कसे हाच महत्त्वाचा प्रश्न अाहे. त्यासाठी पक्षाच्या भूतकाळापासून तर वर्तमानकाळापर्यंतच्या स्थितीवर दृष्टिक्षेप टाकणे क्रमप्राप्त ठरेल.

मुळात मनसेची रचना एकसंघचालकानुवर्ती असून त्याचे सुकाणू राज ठाकरे यांच्याकडे अाहे. नाशिकच्या गढीची सूत्रे राज यांच्याकडे अाली त्यामागे केवळ त्यांचे अाणि त्यांचेच कर्तृत्व हाेते. त्यामुळे ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे सुभेदारी हाेती त्यांचीही कामगिरी वा प्रभाव मनसेपुरताच मर्यादित राहिला. मनसे साेडून गेल्यानंतर येथील सेनापतींची दुसऱ्या पक्षातील एकूणच कामगिरी वा अस्तित्वाची कहाणी सर्वश्रुत अाहे. असाे, लाेकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची जी काही दाणादाण उडाली त्यानंतर माेर्चबांधणीसाठी राज यांनी खास मर्जीतील सेनापती म्हणून संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांना धाडले. पक्षाच्या स्थापनेपासून बालेकिल्ल्यातील प्रत्येक निर्णयाची जबाबदारी असलेले वसंत गिते त्यांच्याबराेबर मनसेतून बाहेर पडलेल्या सैनिकांचे प्रमुख लक्ष्य मनसेची गढीच असेल हेही ठाऊक हाेते. मनसेची नाजूक अवस्था लक्षात घेत एक-एक माेहरे गळाला लावण्यासाठी गिते गटाने धडपड सुरू ठेवली. दुसरीकडे अभ्यंकर यांना गढाची भगदाडे बुजवण्याबराेबरच येथील कारभार गुण्यागाेविंदाने सुरू ठेवण्याची कसरत करावी लागली. अाता अभ्यंकर हे नाशिकच्या दृष्टीने म्हटले तर स्थानिक नव्हते. साहेबांनी पाठवलेला खास दूत अशीच त्यांची अाेळख हाेती. साहजिकच स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणेही त्यांना भाग पडले. त्यात खुद्द राजाचेच धाेक्यात अालेले साम्राज्य, कमी झालेली ताकद सैनिकांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा यामुळे पुनर्भरारीची प्रचंड अात्मकांक्षा ठेवून असलेल्या अभ्यंकर यांना अापला कधी घात झाला हेच कळले नाही. अभ्यंकर यांच्याविषयी वाढती नाराजी, सैनिकांना थाेपवून धरण्यासाठी नवीन याेजना रचण्यासाठी अाता ठाकरे यांनी नांदगावकर यांना पाठवले अाहे. राजकारणाचा प्रर्दीर्घ अनुभव ग्राउंड कनेक्ट असलेला नेता म्हणून त्यांची अाेळख अाहे. मात्र, नाशिकच्या गढीची दुर्दशा लक्षात घेत त्यांच्याकडून कितपत बांधबंदिस्ती हाेईल हाच प्रश्न अाहे. मुळात नाशिकच्या गढीवर खराेखरच मनसेला अापली पताका फडकवत ठेवायची असेल तर राज यांनाच रिंगणात उतरणे क्रमप्राप्त अाहे. यापूर्वी अभ्यंकर हे विशिष्ट गटापुरतेच मर्यादित राहिले. परिणामी, प्रस्थापित पदाधिकारीअाता नांदगावकर यांना अापल्याच पक्षातील विराेधी गटाचे सेनापती समजत अाहे.
नाशिकला काेणीही नियंत्रक म्हणून पाठवले तरी, येथील यादवी थांबणार नाही. जर खराेखरच येथील सैन्य एकसंघ करायचे असेल तर राज यांनाच गढीवरील संपर्क वाढवावा लागणार अाहे. दुर्दैवाने राज यांचे नाशिककडे लक्षच दिसत नाही. नाशिकमध्ये मनसेने गाेदापार्क, पांडवलेणी येथील बाॅटनिकल गार्डन, शस्त्र संग्रहालयासारखे अनेक प्रकल्प केले अाहेत. शहरातील नवीन रस्ते हेही मनसेच्या राजवटीतील अाहेत. या सर्वांचे श्रेय घेण्याची किंबहुना हे अाम्ही केल्याचे सांगण्याची मानसिकताही सैन्याची नाही. एकीकडे केलेल्या स्मार्ट सिटीचे भाजप श्रेय घेते, मात्र केलेल्या कामाबाबत मनसे थंड असल्यामुळे अशा पक्षाच्या हातात अापले भवितव्य नाशिककर कसे साेपवतील याचाच विचार ठाकरे यांनी करणे गरजेचे अाहे. यापूर्वी नाशिकशी वेळाेवेळी संपर्क साधेल. महिना-दाेन महिन्यातून नाशिकमध्ये चक्कर असेल असेही ठाकरे यांनी सांगितले हाेते, मात्र अलीकडे राज यांचे नाशिकमधील येणेही कमी झालेले अाहे. यापूर्वी पूरपरिस्थिती पाहणीच्या निमित्ताने नाशिकमध्ये त्यांची एक फेरीही झाली. मात्र, संघटनाबांधणी अागामी रणनीतीबाबत त्यांनी काेणतीही चर्चा केली नाही. राज यांचे येणे-जाणे वा दाेन शब्द प्रेमाने बाेलणे हेच सैनिकांचे खरे टाॅनिक अाहे. त्यांची जागा अन्य काेणीही घेऊ शकत नाही हेही स्पष्ट अाहे. अशा परिस्थितीत राज यांना खराेखरच नाशिकचे सैन्य एकसंघ ठेवायचे असेल तर स्वत: सूत्रे हातात घेणे गरजेचे झाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...