(भावनाताई भार्गवे)
वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, उत्तम प्रशासन, अभ्यासू वृत्ती, हाडाच्या शिक्षिका, उत्तम वक्त्या, लेखिका, कणखर व्यक्तिमत्त्व, कुशल मार्गदर्शिका असे अनेक गुण असलेल्या आमच्या बाई, भावना भार्गवे आमच्यातून गेल्या यावर विश्वासच बसत नाही. आज त्यांच्याबरोबर काम केल्याच्या स्मृती जाग्या झाल्या...
भावनाताई भार्गवे... आमच्यासाठी त्या माेठ्या बाईच. सन १९८३ ते १९९० या कालावधीत मोठ्या बाई शासकीय माध्यमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका हाेत्या. मी १९८४ मध्ये शाळेत हजर झाले, तेव्हा प्रथमत: बाईंना बघितले. उंच शिडशिडीत बांधा, करारी चेहरा, टापटीप राहणी. त्यांना बघून एक भीतीयुक्त आदर वाटला. परंतु, जसजसे त्यांचे सान्निध्य लाभले तेव्हा कळले त्यांचे प्रशासन अतिशय उत्तम. प्रत्येक गोष्टीचे त्या अत्यंत बारकाईने निरीक्षण करून ‘चांगले’, ‘उत्तम’ असे शेरे देऊन पाठीवर शाबासकीची थाप देत शिक्षकांचे कौतुक करत. त्यांना प्राेत्साहन देत. तसेच, जिथे काही कमी असेल तिथे स्पष्टपणे बोलून त्यावर चर्चा करून तसे सांगतही असत.
त्यांचे मराठी इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व. दहावी तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींचे इंग्रजी विषयाचे तास घेत. रोज प्रशासकीय कामे असल्याने त्या मुलींना सकाळी १० वाजताच शाळेत बोलावून १० ते ११ या वेळेत त्यांना मार्गदर्शन करीत. प्रयोगशीलता हा त्यांचा आणखी एक गुण. त्यांनी शाळेत अनेक नवीन उपक्रम राबविले. महिन्यातून एकदा शिक्षकांनी गट पाडून एका पुस्तकाचे परीक्षण करायचे. त्यामुळे त्या पुस्तकाचे लेखक, त्या पुस्तकातील लेखकाचा परिचय, त्यातील आशय अशा सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसमोर सांगायच्या. त्यामुळे एक-एक पुस्तकाचा सखोल परिचय विद्यार्थ्यांना व्हायचा. वाचन, बोलण्याची कला, स्टेज डेअरिंग यासारख्या गोष्टी यातून आत्मसात हाेत हाेत्या. बाई आठवड्यातून एकदा साप्ताहिक बातम्या सादर करण्यास सांगत.
बातम्या एकमेकांत गुंफून सादर करण्याची कला यामुळे वृद्धिंगत होत होती. प्रत्येक शिक्षकाला त्या आदर्श पाठ घेण्यास सांगत होत्या. त्या आदर्श पाठाची संपूर्ण तयारी करून आपण तो वर्गात सादर करायचा सर्व तज्ज्ञांनी, इतर शिक्षकांनी त्यांचे निरीक्षण करायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय द्यायचे कसे द्यायचे हे अचूक कळायचे.
शालेय विद्यार्थिनींचे गट पाडून त्यांना पृथ्वीची पर्यायी नावे, उदा. अवनी, धरित्री, धरणी, धरा अशी नावे देण्यात आली हाेती. आणि वर्षभर या गटांमध्ये सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा होत होत्या. तसेच, बाह्य स्पर्धेतही अनेक पदके त्यांच्या कालावधीतच शाळेस मिळाली आहेत. त्यांच्या लेखनातून तर अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. मग त्यांचे साहित्य असाे वा वर्तमानपत्रातील विविध लेख. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील योगदानामुळेच मोठमोठ्या साहित्यिकांचे मार्गदर्शन शाळेला मिळाले. कवी कुसुमाग्रज, ना. धो. महानोर, शांता शेळके, शिवाजीराव भोसले, वसंत कानेटकर यांना ऐकण्याची संधी मिळाली. त्यांचा सहवास मिळाला. मोठ्या बाईंचे वक्तृत्व उत्तमच. त्या बोलत राहिल्या की, संपूच नये असे होई. त्यामुळेच आमच्या शाळेने वक्तृत्व स्पर्धेत अनेक मोठी पारितोषिके पटकावली.
बाई अत्यंत शिस्तप्रिय होत्या. वेळ त्या काटेकोरपणे पाळत. सगळ्यांनी वेळेतच शाळेत हजर राहावे, विद्यार्थिनींनी मधल्या सुटीनंतर लगेच वर्गात हजर व्हावे, तासही वेळेवर सुरू व्हावेत, याकडे त्या अतिशय बारकाईने लक्ष देत. मुलींचा गणवेश स्वच्छ, नीटनेटका असावा, याचा त्या आग्रह धरीत. शिक्षकांनीही आठवड्यातून एकदा आवर्जून गणवेश घालावा, असे त्यांचे मत होते. ‘शाळा हे एक कुटुंब आहे. तुम्ही माझे हात-पाय आणि इतर अवयव आहात. आपण सगळ्यांनी मिळून काम केले तर विद्यार्थिनींचे भले होईल,’ असे त्या नेहमी सांगत. अशा नेक गुणसंपन्न आमच्या बाई आज आमच्यातून गेल्यात तरी त्या आमच्या मनात कायम राहणार आहेत.
- ज्योती चौधरी, मुख्याध्यापिका, शासकीय माध्य. कन्या विद्यालय, नाशिक