नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात समाजाची नस अचूकपणे ओळखून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आमदार अँड. उत्तमराव ढिकले सोमवारी (दि. 10 फेब्रुवारी) वयाची 74 वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचे सुहृद मधुकर झेंडे यांनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले काही पैलू..
गेली अनेक दशके समाजभान जपून राजकारण करणारे आमदार अँड. उत्तमराव ढिकले साधेपणा जपणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांचे राजकारण व समाजकारण सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अनेकांना माहिती नाहीत. साहित्यप्रेम हा त्यापैकीच एक पैलू. अँड. ढिकले यांना साहित्याची उत्तम जाण असून, ते चांगले लेखकदेखील आहेत.
स्वत:चा वाढदिवस कायमच साधेपणाने साजरा करण्याकडे अँड. ढिकले यांचा कल राहिला आहे. सन 2000 मध्ये एकसष्ठीनिमित्त कुठलाही सोहळा आयोजित न करता त्यांनी मित्रमंडळींच्या आग्रहाखातर ‘गल्ली ते दिल्ली’ हे आत्मवृत्त प्रकाशित केले, तर 2008 मध्येदेखील वाढदिवशी त्यांनी ‘यश आणि यशच’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. यंदा ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे वाढदिवसाचा सोहळा साजरा व्हावा, असा मित्रमंडळींचा आग्रहदेखील त्यांनी नाकारला. मात्र, त्यांच्या शालेय जीवनापासून राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. सोमवारी त्याचे प्रकाशन होणार आहे.
कबड्डी, कुस्तीप्रेमी असणार्या अँड. ढिकले यांनी क्रीडापटूंना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याला कायमच प्राधान्य दिले. पंचवटी सार्वजनिक वाचनालयाची सुसज्ज इमारत उभारून त्यांनी नाशकातील वाचनसंस्कृतीला मोठी चालना दिली. नगरपालिका ते महापालिका, सहकार, बँकिंग क्षेत्र असा प्रवास करताना त्यांनी विविध लोकोपयोगी योजना शहरात राबविल्या. 1999 मध्ये शिवसेनेचे खासदार म्हणून संसदेत गेल्यानंतर तेथेदेखील त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला. त्या वेळी सिंहस्थासाठी मोठा निधीदेखील त्यांनी मिळविला होता. आता मनसेचे आमदार म्हणून काम करतानादेखील ते त्याच तडफेने समाजहिताची भूमिका मांडताना दिसत आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला अमृतमहोत्सवी वर्षातील पदापर्णानिमित्त भावी जीवनासाठी शुभेच्छा!