आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांचा हात अन् गटबाजीला साथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कॉँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला निवडणुकीपेक्षा संघटनात्मक पदांसाठी होणार्‍या कुरघोडीच्या राजकारणाचाच सामना करावा लागत आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात कॉँग्रेसचा प्रभाव दिवसेंदिवस घटतच चालल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष दुसर्‍या स्थानावर होता. शिवसेनेकडे पालिकेची सत्ता होती, तर विरोधी पक्षनेतेपद कॉँग्रेसकडे होते. दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत मात्र कॉँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेली. अंतर्गत राजकारणातून कॉँग्रेसच्या वजनदार नगरसेवकांचा पराभव झाला व या पराभवाला जबाबदार धरून आमदार जयप्रकाश छाजेड यांच्याविरोधात उघडपणे मोहीमच सुरू झाली. त्यातून छाजेड यांनी छुपा डाव खेळत वादग्रस्त ठरलेल्या शहराध्यक्षपदावर आपले पुत्र आकाश यांना विराजमान करण्यात यश मिळवले. त्यानंतर कॉँग्रेस व प्रतिकॉँग्रेस असा संघर्ष जवळपास तीन वर्षे चालला. निवडणुकीच्या तोंडावर आकाश यांची गच्छंती झाली व महिलेला विरोध होणार नाही, या विचारातून अश्विनी बोरस्ते यांना शहराध्यक्षपद मिळाले. मात्र, व्यक्ती बदलल्यामुळे कोणाच्या महत्त्वाकांक्षा कमी होणार नाहीत, याचा विचार कुणीच केला नाही. त्यातून शहराध्यक्षपदासाठी दावेदारी करणार्‍या सर्वांचीच निराशा झाली आणि या निराशेतून पुन्हा एका नवीन गटाचा जन्म होणार असल्याचे संकेत मिळाले.

वास्तविक बोरस्ते यांची पाटी कोरी असली तरी त्यांना शहराध्यक्ष करण्यासाठी ‘दोन माणिकांनी’ महत्त्वाची साथ दिली, हे लपून राहिलेले नाही. शहराच्या कारभारात ग्रामीण भागातील एका आमदाराने ढवळाढवळ करून आपला गट मजबूत करण्याची बाब गटबाजीच्याच व्याख्येत मोडत असल्यामुळे विरोधकांच्या तलवारी पुन्हा लखलखू लागल्या. त्याचाच प्रत्यय शहराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख नेत्यांच्या कोपरखळ्यांतून आला. बोरस्ते यांच्या नियुक्तीला हातभार लावणार्‍यांचा समाचार घेताना, ज्या छाजेड यांना तीन वर्षे कडाडून विरोध झाला, त्यांच्या पाठीवर मात्र कौतुकाची थाप मारली गेली. त्यामुळे विरोधकांचा विरोध छाजेड यांना होता की शहराध्यक्षपदाची खुर्ची मिळवण्यासाठी, असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. कोकाटे यांनी ज्येष्ठ नेत्याच्या रूपाने समजुतदारीची भूमिका घेण्याचे सोडून आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे गटबाजांना टोले लगावले. हे करताना मंत्रिपद न मिळण्यामागे दिल्लीत आपले वजन पडत नाही, अशी कबुलीही त्यांनी देऊन टाकली. जे येतील त्यांचे स्वागत अन्यथा पक्षकार्य होईलच, असे सांगत त्यांनी नाराजांना चुचकारण्याचे सोडून आव्हान दिले.

दुसरी बाब म्हणजे, केवळ पदासाठीच नव्हे, तर तिकिटासाठी पक्षाला आव्हान देण्यातही मागेपुढे बघितले जात नसल्याचे दिसून आले. म्हणूनच की काय दिनकर पाटील यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना टोला लगावताना दिंडोरीसाठी काय आग्रह धरता, नाशिकची जागा कॉँग्रेसला सोडण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला दिला. कॉँग्रेसला जागा सुटली नाही तर बंडखोरी करून निवडून येईन, असे उघड आव्हान देऊन पाटील यांनी पक्षापेक्षा उमेदवारी महत्त्वाची असेच दाखवून दिले. विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून उपस्थित असलेल्या प्रभारी भाई जगताप यांनीही बंडखोरांना समज देण्याऐवजी विरोधकांवर टीका करण्यातच धन्यता मानली.

आकाश छाजेड हे शहराध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर कॉँग्रेसमधील वाद शमण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, वाढती महत्त्वाकांक्षा, प्रत्येकालाच पदाची हाव व पक्षापेक्षा मीच कसा महत्त्वाचा, या ईर्षेतून संघटनेविरोधात जाण्याची हिंमत दाखवण्याचे वाढते प्रकार बघितले तर छाजेड यांना व्यक्ती म्हणून विरोध नव्हता, तर त्यांनी जी खुर्ची धारण केली त्या शहराध्यक्षपदालाच वादाचे ग्रहण आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. वादापासून चार हात दूर असलेल्या अश्विनी बोरस्ते यांची शहराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतरही गटबाजी व प्रतिकॉँग्रेसचे राजकारण कायम असल्यामुळे कॉँग्रेसला विरोधकांपेक्षा अंतर्गत लाथाळ्यांचा सामना करावा लागेल, असे दिसते.