आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज' गुरुजींचा टाइमपास अन् विद्यार्थी नापास..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपासून सातत्याने वादात असलेल्या कॉँग्रेस शहराध्यक्षपदावरून अखेर आकाश छाजेड यांची गच्छंती होऊन अश्विनी बोरस्ते यांना संधी मिळाली. छाजेडविरोधकांनी आकाश यांना हटवल्याचा आनंद मानला, तर छाजेड यांनी आपल्याच गटातील सर्मथकाला संधी दिल्याचे सांगत आपलाच विजय झाल्याचे सांगितले. या दोन्ही गटांचे नेतृत्व दोन आमदारांच्या खांद्यांवर असल्याचेही आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात दोन्ही आमदारांना एकत्र आणून काम करताना नवीन शहराध्यक्षांची कसोटी लागेल.

सत्ता मिळाली तर महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करून दाखवतो, अशी गर्जना राज यांच्याकडून नेहमीच केली जाते. विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. विकासाचे व्हिजन फक्त माझ्याकडेच आहे, असे ठाकरे यांचे आश्वासक बाण मतदारांच्या काळजाला भिडले. त्यातून त्यांनी नाशिक महापालिकेच्या रूपाने सत्तेच्या चाव्याही मनसेला दिल्या. केवळ नाशिकच नाही, तर मुंबई-पुण्यातही राज यांचा करिष्मा दिसला. अलीकडेच जळगाव महापालिकेतही मनसेने भरारी घेतली. अशा जागा वाढत असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांनी आपल्याच सेनापती वा सैनिकांच्या चुका अधोरेखित करण्याचे सत्र सुरू केल्यामुळे आता मनसेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

मुळात मनसेत एकसंघचालकानुवर्ती व्यवस्था असल्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी राजगडावरील हिरवा कंदील बघितल्याशिवाय पुढे चालताच येत नाही. त्यातून पक्ष चालवणे वा सैनिकांना सांभाळून ठेवण्याच्या कसरतीसाठी आर्थिक बाजूही सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. ही सर्व परिस्थिती जुळवून आणण्यासाठी प्रशासनाशी ‘जमवून’ घेण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे एकदा प्रशासकीय यंत्रणेशी जमवून घेण्याची भूमिका घेतली तर पुढे त्यांनाच नाकर्ते म्हणत दूषणे देणार कशी, असा प्रश्न आता कारभारी विचारत आहेत.

खरेतर राज यांच्या नवनिर्माणाची व्याख्या अद्यापही मनसेच्या कारभार्‍यांना समजली की नाही, हाच प्रश्न आहे. सत्ता मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जे काही दौरे केले ते एकतर विकासकामांचे उद्घाटन किंवा गोदापार्कसारख्या मोठय़ा प्रकल्पांसाठी चाचपणी, चर्चासत्रे, तज्ज्ञांच्या भेटीगाठी एवढेच. सामान्यांना गोदापार्कपेक्षाही पाणी, कचरा, अतिक्रमण, रस्ते या समस्या भेडसावत असतात. मात्र, राज यांच्या कोणत्याही दौर्‍यात या समस्यांबाबत पावले उचलली गेली नाहीत. प्रत्यक्षात त्यावर कारवाई आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केली जात आहे. मुळात नाशिकच काय, पुणे व मुंबईत जरी राज यांनी नगरसेवकांच्या अपयशावर बोट ठेवले असले तरी त्यातून त्यांच्याकडूनही कळत-नकळत किंवा संघटना विस्ताराच्या व्यापात मूळ मुद्याकडे दुर्लक्षच झाले असल्याची जणू कबुलीच ते आता महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांतील झाडझडतीतून देत आहेत. त्यातून राज यांचे सैनिक कार्यान्वित झाले असले तरी आता वेळ निघून गेली आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी ग्राउंड लेव्हलवर जी कामगिरी करण्याची संधी होती ती बर्‍याच प्रमाणात निघून गेली आहे. त्यातून गुरुजींनी सुधरवण्यापेक्षा छडीचा प्रसाद देण्याचा सपाटाच लावल्यामुळे आता विद्यार्थीही भांबावून गेले आहेत.

दोघांच्या भांडणात काँग्रेस शहराध्यक्षांची कसोटी
नाशिकपाठोपाठ पुण्यातही राज गुरुजींच्या प्रगतिपुस्तक तपासणीत मनसेचे नगरसेवक नापास ठरले. त्यातून राज यांनी ‘जमत नसेल तर सत्ता सोडा’ असे फर्मान पुन्हा एकदा सोडले. प्रत्येक दौर्‍यात स्वकीयांच्या चुकांवर बोट ठेवून राज ठाकरे हे विकासाला खीळ बसण्यामागे स्थानिक कारणीभूत असल्याचे सांगत असले तरी नियंत्रक वा मार्गदर्शकाच्या भूमिकेतील स्वत:चे अपयशही अधोरेखित करीत आहेत. लोकसभेच्या तोंडावर मनसेचे अपयश झाकण्यासाठी राज गुरुजींचा ‘टाइमपास’ही चर्चेत आला.