नाशिक- कुणी काचेच्या तुकड्यांपासून तयार केलेला बाप्पा, तर कोणी लोकरचा वापर करीत साकारलेला गणपती... घरगुती वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करत विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पाच्या कलात्मक आविष्कारातील मंगलमूर्ती साकारल्या. शाडूच्या मातीपासून ते काचेचे तुकडे, लोकर, थर्मोकॉल, क्लॉथ, सीडी, विविध रंगांचे कार्डशीट, पाण्याची बाटली अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून श्रींच्या मूर्ती साकारल्या.
कॉलेजरोड येथील आयएनआयएफडीच्या वतीने गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचे व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी इंटेरिअर आणि फशनच्या विद्यार्थ्यांचे तीन ग्रुप तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घरगुती वस्तूंपासून ते वापरात नसलेल्या वस्तूंचा वापर करीत
आपल्या कल्पकतेच्या जोरावर गणपतीची नानाविध मनमोहक रूपे साकारली. अतिक वर्तक, वैभव निकम व स्नेहा खदिजा यांच्या ग्रुपला संस्थेचे संचालक सुरजितसिंग मनचंदा यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. अनेक रंगीबेरंगी धागे-दोरे एकत्र आले की त्याची सुंदर कलाकृती तयार होते. याचेच उदाहरण म्हणजे हा लोकरचा तयार झालेला बाप्पा.