आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त: ‘नारायण कुटीर’ची चौकशी; उतार्‍यावर नाव मात्र मूळ मालकाचेच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आसारामबापू यांच्या मुलाचे नाव असलेल्या ‘नारायण कुटीर’ या वादग्रस्त इमारतीच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गिरणारे ग्रामपंचायतीला दिले आहेत. ग्रामपंचायतीने केलेल्या प्राथमिक तपासणीत ही इमारत र्शी योग वेदांत सेवा समितीची असली तरी उतार्‍यावर मात्र अजूनही मूळ मालकाचेच नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आसारामबापू यांच्या आर्शमातील अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. देशभर असलेल्या त्यांच्या आर्शमांचे बांधकाम, त्यांची मालकी याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिकमध्येही गोदावरी नदीकाठी असलेल्या आर्शमाचे अनधिकृत बांधकाम आणि विकास आराखड्यातील जागेवर केलेले अतिक्रमण असो की गंगापूर धरणापासून काही अंतरावरच असलेल्या दीड एकरवर बांधकाम असलेली ‘नारायण कुटीर’ नावाची इमारत हे त्यापैकीच एक होय. गिरणारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या संपूर्ण बांधकामाला आर्शम ट्रस्टने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचे तसेच त्याबाबत ग्रामपंचायतीकडे कोणतीही नोंद नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांना ग्रामसेवक बी. ए. राजगुरू यांनी कळविले असले तरी परदेशी यांनी यासंदर्भात राजगुरू यांच्याकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. गिरणारे हद्दीतील गट नं. 281 वर आसारामबापू यांची टोलेजंग इमारत उभी आहे. सत्संगावेळी नाशिकमध्ये मुक्कामी असलेले बापू याच ठिकाणी विर्शांतीसाठी येत असत. नाशिकपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमारतीबाबत कधी फारशी चर्चाही शहरवासीयांना नव्हती. यामुळे या इमारतीविषयी आता कुतूहल निर्माण होत आहे.

उद्देश गुपितच
इमारत नेमकी कोणत्या उद्देशासाठी बांधली आहे, याविषयीची कोणतीही माहिती ना ग्रामपंचायतीकडे आहे ना महसूल खात्याकडे आहे. यामुळे इमारतीविषयी गुप्तता पाळण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न निर्माण होतो. किमान ग्रामपंचायतीकडे नमुना नं. 8 मध्ये बांधकामाविषयीची नोंद असावी लागते. मात्र, ही नोंददेखील नसल्याची बाब आढळून आली आहे. यामुळे इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केल्याची माहिती ग्रामपंचायतीने नाशिक पंचायत समितीला कळविली आहे.

ग्रामपंचायतीने केली पाहणी
‘दिव्य मराठी’मध्ये ‘नारायण कुटीर’ या इमारतीसंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गिरणारेचे सरपंच दौलत निंबेकर, ग्रामसेवक बी. ए. राजगुरू तसेच काही सदस्यांनी गट नं. 281 वरील या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. या इमारतीला घरपट्टी लागू नसून, येत्या दोन दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नाशिक पंचायत समितीकडून कारवाईचा बडगा उगारला जाईल.

सविस्तर अहवाल मागितला
बहुचर्चित आसारामबापूंच्या ‘नारायण कुटीर’ या इमारतीविषयी चौकशी करून ग्रामपंचायतीकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. ही इमारत बांधण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नसून, इमारत बांधण्यामागील उद्देश काय आहे, याचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 124 नुसार कायदेशीर कारवाई संबंधितांविरुद्ध करण्यात येणार आहे. तसेच, अजूनही मूळ मालक दत्तू उगले यांचेच नाव संबंधित जागेला आहे.
-रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी, नाशिक पंचायत समिती