आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Sanskar Sarita Exam And Book Fess Issue In Nashik

खळाळून वाहतेय संस्कार सरिता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आसारामबापूंच्या ‘लीला’ जगासमोर येऊनही जिल्ह्यातील काही शाळांनी ‘बापूगिरी’ सोडली नसून त्यांच्या विचारांचा प्रचार सर्रास केला जात आहे. या विचारांच्या प्रसारासाठी घेण्यात येणारी परीक्षा व पुस्तकांचे सशुल्क वाटप करण्यात येत आहे. बापूंवर करण्यात आलेले आरोप पाहता त्यांच्याकडून विद्यार्थी कोणता आदर्श घेतील आणि या आदर्शातून भावी पिढी कशी उभी राहील, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुली-महिला आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आसाराम यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे, बापूंच्या आर्शमासाठी अनेक ठिकाणी शेतकरी व सरकारच्या जमिनी बळकावल्याचाही आक्षेप आहे. मात्र, ही गोष्ट जणू काही कानीही न पडल्याच्या थाटात त्यांच्या विचारांचा प्रसार वेगात सुरू आहे. आसारामबापूंच्या विचारांच्या परीक्षेला बसावे, असे आवाहन करीत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सहा रुपये शुल्क आकारले गेले. तसेच, या परीक्षेची तयारी करण्यासाठी आठ रुपये किंमत असलेल्या पुस्तकाचीही विक्री केली जात आहे. बापूंविषयी सर्वत्र तिरस्काराची भावना निर्माण झालेली असताना विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विचारांची रुजवण करणे गरजेचे आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.

वह्या-पुस्तकांऐवजी पूजा साहित्य ! : गेल्या वर्षी महापालिकेच्या शाळांमध्येही आसारामबापूंच्या विचारांचा प्रसार सुरू होता. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेऐवजी मातापित्यांची पूजा करण्याचे आवाहन बापूंनी केले होते. त्याचा प्रचार करण्यासाठी बापूंचे साधक पालिकेच्या शाळांमध्ये जात होते. विशेष म्हणजे, यासाठी परवानगीही घेण्यात आलेली नव्हती. मुख्याध्यापक व शिक्षक शिकवणे थांबवून या प्रचारासाठी वेळ देत होते. शाळेत पूजेचे साहित्य घेऊन जाताना विद्यार्थी दिसत होते. अंधर्शद्धा निर्मूलन समितीने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर शाळांमध्ये हे प्रकार बंद करण्यात आले.

यापुढे आम्ही काळजी घेऊ
परीक्षेसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही आवाहन करण्यात आले. परीक्षा शुल्क आकारून पुस्तक वाटप केले असले तरी ते कधी झाले हे तपासावे लागेल. आसारामबापूंवर आरोप झाल्यानंतर या विचारांचा शाळेत प्रसार केला गेला असेल तर ही बाब चुकीचीच आहे. तसे आढळल्यास विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसू नये, असे आवाहन केले जाईल. चंद्रकांत खानकरी, मुख्याध्यापक, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, पळसे

.तर कडक कारवाई
आसारामबापूंच्या विचारांचा प्रसार कोणत्याही शाळेत करता येणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल. ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिलेल्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालतो. आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग