आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Supporters And Police Strugle In Nashik

नाशिकमध्ये आसाराम अनुयायी व पोलिसांत झटापट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आसारामबापू आश्रमाने सतरा वर्षांपासून शहर विकास योजनेतील रस्त्याच्या जागेवर केलेले बेकायदा बांधकाम गुरुवारी पोलिस बंदोबस्तात महापालिकेने जमीनदोस्त केले. यामुळे आश्रमातील संतप्त अनुयायांनी यंत्रणेवरच हल्लाबोल करत काही पोलिस कर्मचार्‍यांवर हात उचलला. पोलिस आणि अनुयायांमध्ये झालेल्या झटापटीमुळे दिवसभर तणावाचे वातावरण होते.''

नाशिक- गोदावरी तीरावर सावरकरनगर येथे सव्र्हे नंबर 5 मधील पावणे सहा एकर जागेवर आसाराम बापू आश्रम आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण जागा हरित पट्टय़ात असून, त्यावर फार्महाउसच्या नावाखाली आसाराम बापू आश्रम ट्रस्टने आश्रम उभारला आहे. या जागेतूनच 18 आणि 24 मीटर डीपीरोडसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. यासंदर्भात महापालिका आणि आश्रम यांच्यात करार होऊनही ही जागा पालिकेच्या ताब्यात मिळालेली नाही. ही बाब ‘दिव्य मराठी’ने निदश्रनास आणून देताच पालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने आश्रमाला नोटीस देत जागेची मोजणी व आखणी करून लगेच अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. त्यात आश्रमातील महिला अनुयायी व पोलिस कर्मचार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचार्‍यांनाही घेराव घालण्यात आला. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी पोलिस खाक्या दाखवताच अनुयायी पांगू लागले. पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी आश्रमाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून अनुयायांना आश्रमात जाण्यास भाग पाडले. यानंतर तणाव थोडा निवळला. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे, सातपूर विभागाच्या प्रभारी अधिकारी मालिनी शिरसाठ, बांधकाम विभागाचे उपअभियंता रमेश पाटोळे, उपअभियंता दौलत घुले यांच्या मार्गदश्रनाखाली सकाळी नऊ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू होती.

प्रशासनाने घेतली खबरदारी
मोहिमेदरम्यान अनुचित प्रकार घडून नये, यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने पूर्णपणे खबरदारी घेतली होती. नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग संपूर्ण तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाला होता. तीन जेसीबी, दहा डंपर, गॅस कटर, अग्निशमन दल वाहन, अतिक्रमण निर्मूलन, बांधकाम विभागाचे 40 कर्मचारी व 100 पोलिसांनी कारवाई केली. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्ता तयार करण्यासाठी साहित्य सोबत होते.

पोलिसांनाही मारहाण
अतिक्रमण काढणार्‍या पथकाला आणि पोलिस कर्मचार्‍यांना अनुयायांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्यात काही महिला पोलिस व होमगार्ड जखमी झाले. गंगापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हेमंत राऊत यांच्या उजव्या पायाला मारहाणीत दुखापत झाली. यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी अतिक्रमण काढण्यास आडवे येणार्‍यांची उचलबांगडी करून त्यांना बाजूला सारले.

असा घडला घटनाक्रम
घटनेच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही शिव्याशापांचा सामना करावा लागला. अनुयायांनी अश्लिल शिव्या देऊन आश्रमातून हाकलून लावत छायाचित्रणास मज्जाव केला. बेकायदा बांधकाम आणि शहर विकास योजनेतील डीपीरोडची जागा हस्तांतरित केली जात नसल्याची बाब मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने उघड केली. महापौर यतिन वाघ यांनी या वृत्ताची दखल घेत मंगळवारी आश्रमाच्या पदाधिकार्‍यांना जागा पालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण विभागाने लगेचच बुधवारी जागेची चौरेषा मोजणी करून आखणी करत नोटीस बजावली. गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाचा ताफा आश्रमात अतिक्रमण काढण्यासाठी रवाना झाला. पथक येऊन धडकताच आश्रमात धावपळ उडाली.

काय आहे करारनामा
डीपीरोड हस्तांतरित करण्याबाबत पालिका व आश्रम यांच्यात 30 जून 1997 मध्ये झालेल्या करारात आश्रमातर्फे जिभाऊ नथू सोनवणे आणि काशिनाथ गोविंदराव मोरे यांनी अधिकृतपणे स्वाक्षरी केल्याचा उल्लेख आहे. डीपी रोडअंतर्गत 24 मीटर रोडसाठी 4500 चौ. मी., तर 18 मीटर रोडसाठी 1408.50 चौमी जागा पालिकेच्या ताब्यात विनामूल्य मालकीहक्काने देत असल्याचे करारात म्हटले आहे. रस्त्याच्या जागेच्या क्षेत्रास आश्रमाचे नाव कमी करून नाशिक पालिकेचे नाव लावण्यास संमती असून, त्याप्रमाणे 7/12 उतारे पालिकेने त्यांच्या नावावर करून जागा सार्वजनिक वापरासाठी कायमस्वरूपी विनामूल्य ताब्यात देण्यास संमती देण्यात येत असल्याचेही करारनाम्यात नमूद केले आहे. रस्त्यावर पालिकेची मालकी झाली असून, महापालिकेने त्यांच्या स्वच्छेने वापर करावा. त्यास आमची व वारसाची काही हरकत राहणार नाही व त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास कायदेशीर हक्क असल्याचे करारनाम्याद्वारे लिहून दिलेले आहे.