आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu's Ashram Removed, Police And Bapu Followers Fighting

आसारामच्या आश्रमाचे अतिक्रमण काढल्याने नाशकात पोलिस, आसारामाच्या साधकात झटपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सतरा वर्षांपासून आसाराम बापू आश्रमाने नाशिक शहर विकास योजनेतील रस्त्याच्या जागेवर केलेले बेकायदेशीर बांधकाम गुरुवारी महापालिका आणि पोलिस यंत्रणेने जमीनदोस्त केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आश्रमातील साधकांनी यंत्रणेवरच हल्लाबोल करत काही पोलिस कर्मचा-यांवर हात उचलला. यामुळे पोलिस आणि साधकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे नाशकात दिवसभर तणावाचे वातावरण होते.


1993 मध्ये झालेल्या प्रादेशिक शहर विकास योजनेत स. नं. 5 मध्ये 18 आणि 24 मीटर डीपीरोडसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. मात्र, या जागेवर आसाराम बापू आश्रम असल्याने आजतागायत ही जागा महापालिकेच्या ताब्यात नव्हती. याच जागेवर फार्महाऊसची परवानगी असताना आश्रम ट्रस्टने बेकायदेशीररीत्या बांधकाम केल्याचे तसेच 1997 मध्ये डीपीरोडसाठी लागणारी जागा हस्तांतरित करण्याबाबतचा करारनामा आश्रम आणि महापालिकेमध्ये झालेला होता. असे असताना आश्रमाकडून जागा दिली गेली नाही. ही बाब दिव्य मराठीने निदर्शनास आणून देताच महापालिकेने आश्रमाला नोटीस देत रस्त्याच्या जागेची मोजणी व आखणी करून लगेचच अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान आश्रमातील महिला साधक आणि पोलिस कर्मचा-यांमध्ये धक्काबुक्की झाली.


पोलिसांनाही झाली मारहाण
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला आणि पोलिस कर्मचा-यांना आश्रमातील अनुयायांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यात काही महिला पोलिस व होमगार्ड जखमी झाले. गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी देखील अतिक्रमण काढण्यास अडथळा करणा-या महिला व पुरुषांची उचलबांगडी करून त्यांना बाजूला सारले.


असे झाले अतिक्रमण निर्मूलन
गुरुवारी सकाळी 9 वाजता सातपूर विभागीय कार्यालयाचे उपअभियंता रमेश पाटोळे आणि प्रभारी विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ हे अतिक्रमण निर्मूलन पथकासह सावरकरनगर येथील आसाराम बापू आश्रमस्थळी दाखल झाले. अतिक्रमण काढण्यास सुरुवात करताच आश्रमातील साधकांनी धाव घेतली.


प्रसारमाध्यमांना शिव्या
घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही शिव्याशापाचा सामना करावा लागला. आश्रमातील साधकांनी अश्लील शिव्या देऊन आश्रमातून बाहेर हाकलून लावत छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. बेकायदेशीर बांधकाम आणि शहर विकास योजनेतील डीपीरोडची जागा हस्तांतरित केली जात नसल्याची बाब सोमवारी दिव्य मराठीने उघडकीस आणली. महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी लागलीच या वृत्ताची दखल घेत मंगळवारी आश्रमाच्या पदाधिका-यांना जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. पालिकेने जागेची मोजणी करून आखणी केली आणि त्यानंतर पोलिस बंदोबस्तात गुरुवारी अतिक्रमण अखेर पाडले.