आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजाला भ्रष्टाचारी संबोधणा-या लेखक आशिष नंदी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नाशिक शहर-जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षातील बहुजन समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या बहुजन कृति समितीने विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान. नंदी यांच्या विरोधात सातपूर येथील समाधान जगताप यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद केली. यात नंदीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
याबाबत खासदार समीर भुजबळ म्हणाले की, जयपूरमधील साहित्य संमेलनात आशिष नंदी यांनी दलित आणि ओबीसींविरोधात केलेले वादग्रस्त विधान हा सर्व मागासवर्गीयांचा अपमान आहे. त्यांनी जाणीवपूर्वक हे खोडसाळ विधान केल्याचे सांगत त्यांनी नंदी यांचा जाहीर निषेध केला. यावेळी नगरसेवक संजय साबळे, प्रकाश लोंढे, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक, सिन्नरचे नगरसेवक संजय झगडे, अशोक जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर, मनसेचे शहर चिटणीस अजिंक्य गिते, सुनिल कांबळे, संकल्पीत रिपाईचे नेते प्रकाश पगारे, नाभिक समाज संस्थेचे प्रदेशाध्यक्ष अरुण बिडवे, भारिपचे दीपचंद दोंदे, चर्मकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, समस्त शिंपी समाजाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, महाराष्ट्र कुंभार समाजाचे शहराध्यक्ष रमाकांत क्षीरसारगर, बाळासाहेब जोरवेकर, सचीन जाधव, ओबीसी संघटनेचे शरद माळी, गोवर्धनचे सरपंच प्रल्हाद जाधव यांसह सर्व मागसवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन स्वराज महासंघ
नंदी यांच्या वक्तव्याने ओबीसी, दलित, आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी बहुजन स्वराज्य महासंघाचे अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी पत्रकाद्वारे केली.
राष्ट्रीय दलित पॅँथर
जयपूर येथे साहित्य महोत्सवात दलित, आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेवर घाला घालणारे बेताल वक्तव्य नंदी यांनी केले आहे. हे वक्तव्य जातीय विद्वेष पसरविणारे व देशाच्या एकसंधतेला तडा देणारे आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नानासाहेब भालेराव यांनी केली आहे.
बहुजन संघर्ष समिती
जयपूरमधील साहित्य संमेलनात ओबीसी आणि दलितांमुळे भ्रष्टाचार वाढल्याचे लेखक आशिष नंदी यांनी केलेले वक्तव्य हे या समाजाचा अपमान करणारे आहे. भ्रष्टाचारी हा कुठल्याही समाजातील असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नंदी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.