आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी बोरस्ते काँग्रेस शहराध्यक्षपदी; अँड. छाजेड यांची अखेर उचलबांगडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस शहराध्यक्ष अँड. आकाश छाजेड यांच्याविरोधात मोट बांधून समांतर संघटना चालवणारे पदाधिकारी व स्थानिक नेते अखेर छाजेड यांना पदावरून हटवण्यात यशस्वी ठरले. अँड. छाजेड यांच्या जागेवर नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आली. अचानक झालेल्या या बदलामुळे छाजेडविरोधी गटाकडून जल्लोष केला जात असला तरी घरगुती कारणास्तव पदाला न्याय देऊ शकत नसल्याचे स्वत:हून पक्षश्रेष्ठींना कळवल्यामुळेच हा बदल झाल्याचा दावा छाजेड यांनी केला आहे.

माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना शहराध्यक्षपदावरून हटवून तरुण नेतृत्वाला संधी देण्याची मागणी करण्यात आल्यापासून शहर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. माजी अध्यक्ष शैलेश कुटे, नितीन सुगंधी, अण्णा पाटील यांच्यासह डॉ. हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते यांच्या नावाची चर्चा असतानाच अचानक अँड. छाजेड यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्याच सर्मथक गटाने उघड बंड पुकारले. त्यापाठोपाठ महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीतही छाजेड यांचीच वर्णी लागल्याने असंतोषात भर पडून शहरातील प्रदेश व स्थानिक संघटना पदाधिकार्‍यांनी विरोधाची भूमिका घेतली. दुसरीकडे, छाजेड यांनी कार्यक्रमांचा सपाटा लावत विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.

गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारींच्या दौर्‍यातही विरोधी गटाने जाहीर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले. एक प्रकारे समांतर संघटनाच चालवण्यात येत होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून बदल होत नसल्याने अखेरीस आमदार निर्मला गावित, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, शैलेश कुटे, उद्धव निमसे यांनी स्वतंत्र गट निर्माण करून टिळक भवनावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पाच पदाधिकार्‍यांची समिती स्थापन करून नावे मागवली. त्यात शैलेश कुटे, शरद आहेर व अश्विनी बोरस्ते यांचे नाव आघाडीवर होते. सलग दुसर्‍यांदा नगरसेवक झालेल्या व बचतगटाच्या माध्यमातून राज्यभरात पोहचलेल्या बोरस्ते यांच्या नावावर अखेरीस शिक्कामोर्तब करण्यात आले.

बोरस्ते यांना सहकार्य
बोरस्ते यांच्या निवडीचे स्वागत. पक्षश्रेष्ठींना दोन महिन्यांपूर्वीच पत्नीचे आजारपण व कौटुंबिक जबाबदारीमुळे पदाला न्याय देण्यात कमी पडत असल्याने नवीन नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्याच अनुषंगाने हा बदल झाला आहे. माझ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात बोरस्ते यांनी केलेल्या सहकार्याप्रमाणेच त्यांना पक्षीय कामात मदत करीन. - अँड. आकाश छाजेड