आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aspirants Make Planning For BJP City President Post

भाजप शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची माेर्चेबांधणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजप संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमांतर्गत सिडकाे मंडलाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या निष्ठावंत अाणि उपरे वादाचीच पुनरावृत्ती शहराध्यक्ष अाणि जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हाेते की काय, असा सवाल स्थानिक पदाधिकारी उपस्थित करीत अाहेत. निष्ठावंतांना डावलून दहा वर्षांत तीन-तीन पक्षांशी घराेबा करीत ‘घरवापसी’ करणाऱ्यांची वर्णी लागण्याच्या भीतीने निष्ठावंतांमध्ये वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांमध्ये अस्वस्थता अाहे.

सिडकाे सातपूर मंडल अध्यक्षांच्या निवडणुकीत एेनवेळी स्थानिक, वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्यांना डावलत बाहेरून अालेल्यांना स्थान देण्यात अाल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच जाहीरपणे केला. सिडकाे मंडल अध्यक्षांच्या निवडीवरून अामदार सीमा हिरे अामदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये नावही नसलेल्या अाणि यापूर्वी पक्षाची जबाबदारी पेलल्याचेही एेकिवात नव्हते, अशा उमेदवाराची नियुक्ती जाहीर हाेताच गाेंधळ उडाला. या नियुक्तीवरून काेअर कमिटीपर्यंत नाव पाेहोचविणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न उपस्थित झाला. याबाबत खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही अनभिज्ञता दर्शविल्याने त्यास एकप्रकारे दुजाेराच मिळाला. सातपूर अध्यक्षपदासाठी इच्छुक शिवाजी शहाणे, याेगेश मालुंजकर, रवींद्र उगले यांच्याएेवजी राजेंद्र दराडे यांची नियुक्ती झाल्यानेही वाद झाला.
शहराध्यक्षपदासाठी सुरेशअण्णा पाटील, विजय साने, सुनील केदार, सुनील अाडके, गणेश कांबळेे यांच्यासह अाणखी दाेघे-तिघे इच्छुक अाहेत. यात दाेघांनी राष्ट्रवादीचा प्रवास पूर्ण केला अाहे, तर जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस असा प्रवास करून अालेले माणिकराव काेकाटे, शिवसेना-मनसेतून अालेले वसंत गिते, शिवसेना-राष्ट्रवादीतून अालेले सुनील बागुल यांच्यासह पक्षात दाेन दशकांपासून असलेले निफाडचे शंकर वाघ, मालेगावचे दादाजी जाधव विद्यमान अध्यक्ष विकास देशमुख हेही इच्छुक अाहेत. दरम्यान, इच्छुकांनी मध्यस्थांमार्फत प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री महसूलमंत्री पालकमंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले अाहे. यामध्ये एका इच्छुकांकडून अापल्याला विधानसभेच्या वेळीच तिकीट नाकारताना शहराध्यक्षपदी संधी दिली जाणार असल्याचे अाश्वासन दिल्याचाही दावा केला जात अाहे. त्यामुळे नेमकी काेणाच्या गळ्यात माळ पडेल, याविषयी सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण झाली अाहे.

शिस्तीचा शिरस्ता कायम राहणार का?
शिस्तीचेअाणि संघ परिवाराच्या संस्कारांचे धडे देणाऱ्या भाजपतही काँग्रेसप्रमाणे निष्ठावंतांएेवजी बाहेरच्यांना संधी अथवा प्रदेश पातळीवरून नावाचा लखाेटा येणार की काय? अशी चर्चा सुरू झाली अाहे. पक्षाच्या पडत्या काळात वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा मिरविणाऱ्यांना सत्ता येताच बाजूला सारले जाण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. त्यात ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराविराेधात मतदान केल्याने पक्ष कार्यकर्त्यांना ज्यांच्या घरावर माेर्चा काढावा लागला हाेता, अशीच मंडळी इच्छुक असल्यानेही अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.