आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूररेषेतील बांधकाम परवानगी मनसेसाठी धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा मतदारवर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पूररेषेतील बांधकामांना विशिष्ट अटींद्वारे परवानगी देण्याचा प्रस्ताव तब्बल सहा महिन्यांपासून भिजत पडला असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता आता हा प्रस्ताव पुन्हा चार महिने रखडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाची व्होटबॅँक यामुळे विरोधात जाण्याची भीती खुद्द मनसेतील इच्छुक खासगीत व्यक्त करीत असून, या पार्श्वभूमीवर येत्या महासभेत तरी धोरण ठरते की नाही याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. जानेवारी महिन्यात पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचा विषय महासभेत उपस्थित झाला होता. त्यावेळी गुरमित बग्गा यांनी जोरदार युक्तिवाद करीत, जुने नाशिकसारख्या गावठाण क्षेत्रात महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी अनेक मोठ्या इमारती व बांधकामे तयारी झाली. काही बांधकामे तर नगरविकास कायदा अर्थातच टीपी येण्यापूर्वीची आहे. त्यावेळी पूररेषाही अस्तित्वात नव्हती.
आजघडीला अशा इमारतींना पन्नासहून अधिक वर्ष झाली असून, ती धोकेदायक झाली आहे. प्रत्येक वेळी धोकेदायक इमारतीची नोटीस देण्यापेक्षा अशा मिळकतींचा पुनर्विकासाची परवानगी देण्याचा प्रस्ताव बग्गा यांनी मांडला होता. त्यास विशिष्ट अटीही घालून देत भविष्यात पूरहानी झाल्यास त्यास नुकसानभरपाई मिळणार नाही वा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी राहणार नाही, अशाही सूचना होत्या. त्यास जुने नाशिक भागातील अनेक नगरसेवकांनी समर्थन दिले होते. त्यावर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी अन्य महापालिकांचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यावर सहा महिन्यांत निर्णय झालाच नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मार्गदर्शन मागवले गेल्याचे सांगितले. मात्र, त्याचा तपशील जाहीर झालेला नव्हता. दरम्यान, मागील महासभेत पुन्हा बग्गा व शाहू खैरे यांनी पूररेषेतील बांधकामाच्या परवानगीच्या प्रस्तावाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर महापौर वाघ यांनी पुढील सभेत निर्णय घेऊ, असे सांगत पडदा टाकल्यामुळे पुन्हा प्रस्ताव पुढे ढकलला गेला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 दिवसांत लागण्याची शक्यता असल्यामुळे कधी निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती सभापतीही रिंगणात...
गोदावरीच्या तटावरील नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मनसेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती राहुल ढिकले हेदेखील रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रभागातील बराचसा भाग पूररेषेत असून, येथील बांधकामांवर निर्बंध आहे. त्यामुळे बग्गा व खैरे यांच्यासमवेत ढिकले हे आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.