आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांची मदार नाराजांवर; वजाबाकीच्या राजकारणात निष्ठा दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निवडणुकीलापाच दिवस शिल्लक असताना अंतर्गत गटबाजी रोखण्यात अजूनही राजकीय पक्षांना यश आलेले नाही. तिकीट मिळालेले नाराज पदाधिकारी आपले प्रभावक्षेत्र असलेल्या मतदारसंघात प्रचार करायला तयार नाहीत. एवढेच नव्हे तर या नाराजांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराशी हातमिळवणी करत छुपे संदेश देण्याचे ‘उद्योग’ही सुरू केले आहेत. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांची मदार आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा विरोधी पक्षातील नाराजांवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराला सुरुवात केली होती. प्रत्येक मतदारसंघात एका-एका पक्षाचे तीन ते चार इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला होता. त्यातील एकाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अन्य इच्छुकांचे नाराजी नाट्य सुरू झाले. त्यातील काहींची समजूत काढण्यात श्रेष्टींना यश आले; परंतु अनेकजण आजही नाराजीच्या गर्तेतच पोहत आहेत. इतकेच नाही तर ज्या मतदारसंघातून ते इच्छुक होते, त्या मतदारसंघात प्रचारच करायचा नाही किंवा विरोधी उमेदवाराशी संधान साधायचे अशी रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराला प्रचार करताना नाकीनऊ येत आहे. अशा बिकट परिस्थितीत बहुसंख्य उमेदवारांनी विरोधी गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा आसरा घेतला आहे. हे पदाधिकारी प्रत्यक्षात विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत नसले तरीही त्यांचे कार्यकर्ते मात्र सर्रासपणे या मंडळींबरोबर फिरताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांना संबंधित नाराजांनी ‘कानमंत्र’देखील दिला आहे. त्यानुसार विरोधी उमेदवाराचे प्राबल्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न आहेत.
घर का ना.. घाट का...
शहरातअनेक नाराज असे आहेत की, ज्यांना आपली नाराजी दूर करण्यासाठी कोणीतरी मोठ्या नेत्याने फोन करावा अशी अपेक्षा आहे. परंतु, या नाराजांकडे संबंधित उमेदवारांनीच दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था सध्या तरी ‘घर का.. ना घाट का...’ अशी झाली आहे.