आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर कार्यकारिणीअभावी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडेविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्यामुळे उमेदवारांना जबाबदारी टाकायची कुणावर, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, दुसरीकडे जुन्याच पदाधिकाऱ्यांना पुन्हा गोजारून त्यांची मदत घेण्याची मोठी कसरतदेखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी राजीनामा दिला होता. कोशिरे यांच्या राजीनाम्यानंतर शहराध्यक्षपदावरून चांगलेच वाद निर्माण झाले होते. दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन टिळे यांच्या नावाचा या पदासाठी विचार झाल्यावर मात्र राष्ट्रवादीतील विभागप्रमुखांनी एकजूट करत बंडाचे निशाण फडकाविले होते. त्यातून प्रती राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यापर्यंतही हालचाली झाल्या. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी टिळे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ घालत बंडखोरांना झटका दिला. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही बंडखोरांना कानपिचक्या देत स्वतःची क्षमता ताकद ओळखूनच पदे मागावीत, असा टोला लगावला होता.
टिळे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर कार्यकारिणी बरखास्त केली. मात्र, नाराजांना जवळ करण्याची खेळीही त्यांनी योग्यरीत्या केली. मात्र, पदभार स्वीकारल्यावर महापौरपदाची निवडणूक, विधानसभेच्या तोंडावर इच्छुकांच्या मुलाखती अशा व्यस्त कार्यक्रमात त्यांना शहर कार्यकारिणी जाहीर करणे जमलेच नाही. सूत्रांच्या माहितीप्रमाणे त्यांनी शहर कार्यकारिणी तयारही केली असून, मंजुरीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. दरम्यान, कार्यकारिणी नसल्यामुळे उमेदवारांना महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेळाव्यापासून, तर चौकसभांसाठी कशी तयारी करायची असाही पेच आहे. या पार्श्वभूमीवर अाता उमेदवारांनी जुन्याच पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. याच कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचाराचे नियोजन केले जात असून, यानिमित्ताने जुन्यांचा भाव पुन्हा एकदा वधारल्याचे चित्र आहे.