आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार शेकडो, कार्डवर पत्ता दिला मात्र एकच, कार्डवर वनवैभव सोसायटीचा पत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र याच आयोगाच्या स्थानिक मुखंडांनी मात्र शेकडो मतदार कार्डवर चक्क एकाच इमारतीचा पत्ता प्रिंट करून टाकला आहे.
ज्या इमारतीची क्षमता आठ ते दहा फ्लॅटची आहे व जेथे जास्तीत जास्त 50 लोक राहू शकतात, अशा इमारतींमध्ये शेकडो मतदारांचे बि-हाड थाटण्याची किमयाही निवडणूक विभागाने केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत घरे शोधता-शोधता बीएलओंची दमछाक होत असून, शाळांचा आसरा घेऊन येथेच मतदारांना कार्ड घेऊन जाण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निरोप पोहोचवला जात आहे. लोकसभा निवडणुकीत 'दव्य मराठी'ने कोणीही या आणि मतदारकार्ड घेऊन जा, असा बीएलओ अर्थातच बूथ लेव्हल ऑफिसरच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र त्याउलट चित्र समोर आले असून, यात मतदारकार्ड तयार करणारी यंत्रणाच कशी सदोष आहे व अधिकाऱ्यांचेही त्याकडे कसे दुर्लक्ष होते, हे उघड झाले आहे.
नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील काही मतदारकार्ड हाती लागले असून, यात वनवैभव सोसायटीचा पत्ता छापून अनेक मतदारकार्ड तयार करण्यात आले. प्रत्यक्षात ज्यांची नावे आहेत ते मतदार दुसरीकडेच राहतात. या सोसायटीशी कोणाचाही संबंधही आलेला नाही. वनवैभव सोसायटीप्रमाणेच कल्याणी सोसायटीचाही पत्ता अनेक जणांच्या मतदार कार्डवर आहे. परिणामी, बीएलओंना मतदारांशी संपर्क कसा साधावा, असा प्रश्न पडला आहे. त्यांनीही सरळ राजकीय कार्यकर्त्यांमार्फत निरोप धाडून मतदारांना बोलावणे सुरू केले आहे. विविध शाळांमध्ये डेरा जमवलेल्या बीएलओंकडे जाऊन मतदारकार्ड घेत असले तरी त्यावर पत्ता वेगळा असल्यामुळे मतदार व बीएलओंमध्ये 'तू तू-मै मैं' व वादावादी झाल्याचेही दिसून आले.
इंदिरानगरला राहतो, पत्ता 'वनवैभव'चा
मी अरुणोदय सोसायटी (ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर) येथील रहिवासी असून, माझ्या मतदार कार्डवर पत्ता मात्र वनवैभव सोसायटीचा आहे. पत्ता दुरुस्त करण्यासाठी निवडणूक विभागाकडे गेल्यानंतर आता काहीच होणार नाही, असे उत्तर मिळाले. येथे गेल्यावर शेकडो लोकांच्याबाबत हाच प्रकार झाल्याचे उत्तर मिळाले. संजय अण्णासाहेब जाधव, मतदार