आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे वाजले तीनतेरा, विद्यार्थ्यांची वाहने अडकल्याने ते शाळांमध्ये पोहचेले उशिरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सोमवारी (दि. १३) सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचारफेरी काढली. मात्र, या प्रचारफेऱ्यांमुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळी काढण्यात आलेल्या प्रचारफेऱ्यांमुळे सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी फुटू शकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर झाला. कर्मचाऱ्यांनाही कामावर जाण्यास उशीर झाला. वाहनधारकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील द्वारका, महात्मा गांधीरोड, मुंबईनाका, सिडको,कॉलेजरोड, गंगापूररोड या प्रमुख रस्त्यांवर उमेदवारांनी प्रचारफेरी काढली होती. इतर उमेदवारांनी मतदारसंघातून पायी फिरून मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला. प्रचारफेऱ्यांमुळे द्वारका, एम. जी.रोड, गंगापूररोड, सिडको या भागात वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास द्वारका चौक ते गंजमाळपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहनधारकांचा वाहतूक कोंडीत सुमारे अर्धा ते पाऊण तास वाया गेला. गंगापूररोडवरून दोन उमेदवारांनी वाहनांची फेरी काढली होती.
काही ठिकाणी सकाळी वाजता सुरू होणारी प्रचारफेरी गर्दीअभावी ११ वाजेच्या दरम्यान सुरू झाली. संपूर्ण मतदारसंघात फिरण्यासाठी किमान दोन तास लागले. मात्र, या फेऱ्यांमुळे शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्प झाली. प्रमुख रस्त्यांवर वाहने थांबून होती, तर कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. नाशिकरोड परिसरातही प्रचारफेऱ्यांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. पंचवटी परिसरात सोमवारी निघालेल्या निवडणूक प्रचारफेरीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत शाळकरी विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन अशी अडकली होती.
या रस्त्यांवर वाहतूक कोंडी
महात्मागांधीरोड, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, शरणपूररोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मेनरोड या भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मेहेर सिग्नल ते एम. जी. रोडवरील वाहतूक कोंडीमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत होती.
महिलांची संख्या लक्षणीय
प्रचारफेऱ्यांमध्येमहिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरड्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागत होता. यामुळे मतदारांकडून पिण्याच्या पाण्याची मागणी होत होती. सकाळी १० वाजता सुरू झालेली प्रचारफेरी दुपारी २.१५ वाजेपर्यंत सुरू होती.