आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक पोलिस आयुक्त शालिग्राम पाटील यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाेलिस अायुक्तालयात महिन्याभरापूर्वीच प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या शालिग्राम पाटील यांचे रविवारी (दि. २३) सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात पाेहत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे पाेलिस वर्तुळाला पाटील यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. जिल्हा रुग्णालयात पाटील यांच्या पार्थिवाला मानवंदना देत त्यांच्या मूळ गावी धुळे येथे ते अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात अाले.
सहायक अायुक्त शालिग्राम जनार्दन पाटील (वय ५८) हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास जलतरण तलावात पाेहण्यासाठी उतरले. काही मिनिटांतच त्यांना अचानक पाण्यातच धाप लागून तीव्र झटका अाला. त्याचवेळी बाजूला पाेहणाऱ्या काही विद्यार्थी अाणि जलतरणपटूंना हा प्रकार दिसताच त्यांनी तत्काळ त्यांना पाण्याबाहेर काढले. पाटील यांना लागलीच शेजारीच असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. डाॅक्टरांनी हृदयविकाराचा झटका खूपच तीव्र स्वरूपाचा असल्याने जागीच गतप्राण झाल्याचे सांगितले. सदर घटनेचे वृत्त समजताच आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पाटील यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देत त्यांची पत्नी, दाेन्ही मुले, भाऊ नातलग मंडळीही रुग्णालयात दाखल झाले. पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना अखेरची मानवंदना दिली.

शहीदपाेलिसांना दिलेली मानवंदना ठरली अखेरची : १९८३मध्ये उपनिरीक्षकपदी सेवेत दाखल झालेल्या पाटील यांची पहिली नियुक्ती मुंबईतील सांताक्रूझ ठाण्यात झाली. तब्बल दहा ते बारा वर्षे जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत त्यांनी वरिष्ठ निरीक्षक म्हणून सेवा बजावली. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे २०१३ मध्ये उपअधीक्षक असताना राज्यभरात गाजलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांचा लाचेचा सापळा त्यानंतर जवळपास १६ काेटींची मालमत्ता उघडकीस अाणण्यात पाटील यांनी माेलाची कामगिरी बजावली हाेती. विशेष म्हणजे, रविवारीच कालिका मंदिर येथे खान्देश मराठा वधू-वर पालक मेळाव्याच्या अायाेजनातही त्यांचा सक्रिय सहभाग हाेता. मात्र, अचानक काळाने घाला घातल्याने मेळाव्यापूर्वीच ही घटना घडल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी (दि. २१) पाेलिस स्मृतिदिनी कवायत मैदानावर शहीद पाेलिसांना संचलनाद्वारे मानवंदना देण्यात अाली. याचे सूत्रसंचालन पाटील यांनी करीत त्यांची ही मानवंदना अखेरची ठरली.
बातम्या आणखी आहेत...