आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून निघाली 30 कोटींची रक्कम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तीन दिवस सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एटीएम केंद्रांमधून जवळपास 30 कोटींची रक्कम ग्राहकांनी काढली असावी, असा अंदाज प्रमुख बॅँकांच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शनिवारी आणि रविवारीही नियमित एटीएममध्ये रक्कम लोड केली जाणार आहे. जिल्हाभरातील सर्व बँकांच्या एटीएमवर दिवसभर ग्राहकांची भिस्त दिसून आली. काही बँकांनी ग्राहकांना पैसे काढण्यासाठी ठराविक लिमीट दिले होते, तर काही एटीएममधील रोकड संपल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या.

जिल्ह्यात जवळपास पाचशे एटीएम आहेत, त्यात राष्ट्रीयीकृत बॅँका, सहकारी बॅँका आणि कॉर्पोरेट बॅँकांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी आपल्या एटीएममध्ये दैनंदिन रक्कम लोड करण्याचे नियोजन यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार, शुक्रवारीही रक्कम लोड करण्यात आली. शनिवारी आणि रविवारीही ती लोड केली जाणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याबाबत लक्ष देण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहे. मात्र, शुक्रवारपासूनच एटीएम केंद्रांवर ग्राहकांनी गर्दी केल्याने बहुतांश एटीएम केंद्रांवरील पैसे संपल्याची तक्रार नागरिकांनी केली.

शनिवारी भासणार चणचण - बॅँकांनी एटीएम फुल करण्याचे आश्वासन दिलेले असले तरी सुटी नाशिककर शॉपिंगसाठी घालवितात. त्यातल्या त्यात प्रजासत्ताकदिनाच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामुळे खरेदी वाढणार असून, एटीएमवर लोड येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोकडची चणचण त्यामुळे भासू शकते. ग्राहकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर शॉपिंगसाठी करणे योग्य ठरेल.

आम्ही लोड केले नऊ कोटी- आम्ही शुक्रवारी शहरातील 22 एटीएममध्ये प्रत्येकी 40 लाख याप्रमाणे जवळपास 8 कोटी 80 लाख रुपयांची रोकड भरली आहे. दिवसभरात कोठेही एटीएममध्ये रोकड संपल्याच्या तक्रारी नाहीत. रविवारी पुन्हा रक्कम लोड केली जाणार आहे. ग्राहकांच्या सुविधेची संपूर्णपणे काळजी घेतली जाईल. बाबूलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक ऑफ इंडिया