आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये एटीएम ‘कॅशलेस’, दीड दिवस पुरेल एवढीच रक्कम शिल्लक, नागरिकांत संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नोटाबंदीनंतर सहा महिन्यांत जिल्ह्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे १२५० कोटींच्या मागणीपैकी अवघे ४५० कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात केवळ ८५ कोटी म्हणजे दीड दिवसापुरतीच रोकड शिल्लक असल्यामुळे पुन्हा चलनटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून एटीएमही ‘कॅशलेस’ झाले आहेत. पैसे असलेल्या एटीएमसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
सहा महिने उलटल्यानंतरही नोटबंदीच्या झळा जिल्हावासीयांना सहन कराव्या लागत आहेत. ऐन लग्नसराईत महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. मर्यादित चलन शिल्लक असल्याने बँकांनी आपल्या ग्राहकांनाच प्राधान्याचे धोरण अवलंबल्याने एटीएममध्ये रोकड भरण्याकडेही कानाडोळा केला जात आहे. केवळ बँकांच्या प्रमुख शाखा अथवा मुख्यालयाच्या ठिकाणचीच एटीएम कार्यरत आहेत. जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १६६ एटीएमपैकी अवघे ७० एटीएम सुरू असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. ‘आरबीआय’कडून चलन पुरवठा होत नसल्यानेच अडचणी वाढल्याने चलन तुटवडा जाणवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   
 
पैसे काढण्यावर अघोषित निर्बंध
बँकांमध्ये पैसे नसल्याने एटीएममध्येही नोटा भरल्या जात नाही. शिवाय, चलन तुटवड्यामुळे आरबीआयकडून कुठलेही आदेश नसतानाही एकावेळी केवळ २० हजार रुपयेच काढण्याचे अघोषित निर्बंध बँकांनी घातले आहेत.
 
जिल्ह्यास लागतात राेज ५० काेटी
जिल्ह्यास दररोज कमीत कमी ५० कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यात ३० कोटी शहरासाठी आणि २० कोटी ग्रामीणसाठी आवश्यक आहे. परंतु, एसबीआय आणि खासगी बँकाकडे मिळून अवघी ८५ कोटी रुपयांचीच रोकड शिल्लक आहे. म्हणजे अवघी दीड दिवस पुरेल इतकीच रोकड शिल्लक असल्याने आता दोन दिवसांनंतर ग्राहकांना पैसे मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँक अधिकाऱ्यांनाही ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढली आहे.
 
शंभरच्या नोटांचा तुटवडा
काही एटीएममध्ये रोकड उपलब्ध आहे. मात्र, दोन हजार आणि शंभरच्या नोटांचा तुटवडा आहे. काही एटीएममध्ये केवळ दाेन हजार रुपयांच्याच नोटा शिल्लक असल्याचे आढळून आले.
 
७० टक्के एटीएम बंदच
जिल्ह्यात ९१३ एटीएम आहेत. त्यापैकी शहरात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी बँकांचे मिळून ३०० एटीएम आहेत. त्यापैकी जवळपास ७० टक्के एटीएम बंद असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
 
अाज हाेतील एटीएम लाेड
पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध हाेत नसल्याने निम्म्या एटीएममध्ये कॅश नाही; मात्र गुरुवारी चलन उपलब्ध हाेईल त्यामुळे एटीएममध्ये पुरेशी कॅश भरली जाईल.
- अार. एम. पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर अॅण्ड झाेनल हेड, बँक अाॅफ महाराष्ट्र
 
स्वाइप मशिनवरील करामुळे नागरिकांची हाेतेय लूट...
एटीएमएमध्येखडखडाट असल्याने नागरिक ऑनलाइन व्यवहार करत आहेत. परंतु, पॉस मशिनवर स्वाइप केल्यानंतर बहुतांश ठिकाणी अधिक कर लावत नागरिकांची लूट केली जात आहे. त्यामुळे हक्काचे पैसेही मिळत नाही. शिवाय, शासकीय अडवणुकीतूनच जादा पैसे घेत आकारले जात असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. सहा महिने उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असेल तर नेमकी बदलणार तरी कधी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...