आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-ट्यूब पाहून उच्चशिक्षितांनी एटीएम फाेडले; झटपट श्रीमंत होण्याचा मोह तरुणांच्या अंगलट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोशल मीडियाचा वापर चांगल्या आणि वाईट कामांसाठी होत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनास अाले अाहे. अशाच एक प्रकारात दोन उच्चशिक्षित तरुणांनी यू-ट्यूबवर एटीएम फोडण्याचा व्हिडिओ पाहून चक्क एटीएम फोडण्याचा प्रयत्न शुक्रवारी (दि. १) पहाटे गस्तीवर असलेल्या बीट मार्शलच्या चाणाक्षपणामुळे फसला. दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. या दाेन्ही तरुणांचे वडील शासकीय सेवेत अाहेत. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूरराेडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. या माहितीच्या आधारे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एटीएममध्ये दोन तरुण कटावणी, हातोडा, छन्नीच्या साह्याने एटीएम फोडत असताना निदर्शनास आले. बीट मार्शल पथकाने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र एकजण हातातून निसटला. तोपर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गस्त वाहन दाखल झाले. पथकाने थोड्याच अंतरावर त्यास ताब्यात घेतले. 

चौकशीत अमित साहेबराव गवई, किरण रघुनाथ मोरे अशी त्यांनी नावे सांगितली. अधिक चौकशीत दोघे उच्चशिक्षित असून एकजण बी.एस्सी. तर दुसरा पदवीधर आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून यू-ट्यूबवर एटीएम फोडण्याचा व्हिडिओ पाहून दोघांनी भद्रकाली भंगार बाजारातून कटावणी, छन्नी, हातोडा विकत घेतला. पहाटे वाजता एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फुटले नाही. यातील एकाचे वडील वनविभागात तर दुसऱ्याचे वडील शासकीय कर्मचारी आहेत. झटपट श्रीमंत होण्याचा मोहातून एटीएम फोडण्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली. दोघाही एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बीट मार्शल मिलिंद बहिरम, विष्णू खाडे जे. डी. शिंदे सरकारवाडा पोलिसाच्या गस्त पथकाने ही कारवाई केली. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. चार दिवसांपूर्वी पंचवटीमध्ये सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...