आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्या आकाशकंदिलांची दुनिया न्यारी, घरांच्या दर्शनी भागात अाकर्षक अाकाशकंदील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तात्मा कान्हेरे मैदानालगत सिग्नलवरील भव्य सायकल आकाशकंदील लक्षवेधी ठरतोय. - Divya Marathi
तात्मा कान्हेरे मैदानालगत सिग्नलवरील भव्य सायकल आकाशकंदील लक्षवेधी ठरतोय.
नाशिक - मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र मंगलमय वातावरण असून, या उत्सवात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यात आलेले आकर्षक आकाशकंदील सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. बहुतांश घरांच्या दर्शनी भागात आकर्षक पद्धतीचे आकाशकंदील बसविण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही अनेक ठिकाणी रहिवासी इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. 
 
रंगीबेरंगी सजावट असलेल्या आणि नयनरम्य विद्युत रोषणाईचा कलात्मकतेने वापर करून तयार केलेल्या आकाशकंदिलांच्या वैविध्यपूर्ण रूपांमुळे नाशिककरांना आनंददायी अनुभूती मिळत आहे. त्यातच शहरातील काही संस्था हौशी व्यक्तींनी ‘हटके’ आकाशकंदील लावून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. अशाच संस्थांपैकी एक असलेल्या नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे त्र्यंबकेश्वररोडवरील अनंत कान्हेरे मैदान परिसरातील सिग्नल चौकात लावण्यात आलेला भव्य आकाशकंदील सध्या नाशिककरांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरला आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने साधारणपणे ५० फुटांहून अधिक उंचीवर हा भव्य आकाशकंदील स्थिरावला असून, आकाशकंदिलाच्या खालच्या बाजूला सायकल लावण्यात आली आहे. आकर्षक पद्धतीने बसविण्यात आलेला हा सायकल आकाशकंदील सध्या या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 
 
दुसरीकडे, सिडकोतील शिवशक्ती चौकातील बिपीनचंद्र लावर या हौशी कलाकाराने आपल्या घरावर असाच आकर्षक आकाशकंदील उभारला आहे. त्यात त्याने लाकडाचा आकर्षक पद्धतीने वापर करत आकाशकंदील हाती घेतलेले कार्टून साकारले आहे. घराच्या दर्शनी भिंतीवर बसविलेला हा आकाशकंदील सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. घराच्या दर्शनी भिंतीला केलेली आकर्षक रंगसंगती आणि त्यालगतच एका शिडीच्या सहाय्याने लावलेला हा आकाशकंदील म्हणजे सर्वांसाठीच लक्षवेधी ठरत अाहे. 

शहराच्या अन्य भागांतदेखील लहान-मोठ्या स्वरूपात असे अनोखे आकाशकंदील लावण्यात आले आहेत. त्यात पर्यावरणपूरक आकाशदिव्यांची संख्या मोठी आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने अाकाशकंदील लावताना त्यातून पर्यावरणाचा संदेश देऱ्याचा प्रयत्न उत्साही नागरिकांकडून हाेत अाहे. 
 
पर्यावरणस्नेही आकाशकंदील फुलले 
फटाकेविरहितदिवाळी साजरी करून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम, तसेच सायकलचे महत्त्व पटवून देत साकारण्यात आलेल्या सायकल आकाशकंदिलाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देत आरोग्याचा संदेशही देण्यात आला आहे. याशिवाय घरोघरीही पारंपरिक पद्धतीने पेपरच्या सहाय्याने तयार केलेले आकाशकंदील बसविण्यात आले आहेत. त्यात विद्युत रोषणाईचा वापर केल्याने हे आकाशकंदील सायंकाळच्या वेळी प्रकाशाच्या उत्सवात जणू भरच घालत असल्याचे दिसते. 
बातम्या आणखी आहेत...