आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये अतुल चांडक यांच्‍या अटकेवरून मनसे-राष्ट्रवादीत पुन्हा आरोप-प्रत्यारोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-अतुल चांडक यांना जुन्या गुन्ह्यात रात्री अचानक अटक करण्याच्या घटनेवरून आता राष्ट्रवादी व मनसे आमने सामने आले आहेत. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते यांनी चांडक यांच्या सुटकेनंतर या घटनेमागे पुन्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याच सर्मथकांचा हात असल्याचा आरोप केला, तर तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच न केल्याचे सांगत खुद्द आपणच पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून या कारवाईचा निषेध केल्याचे सांगितले.

चार वर्षांपूर्वी परप्रांतीयांच्या भावना भडकवणार्‍या पत्रकाच्या प्रसिद्धीवरून चांडक यांना बुधवारी रात्री अचानक अटक झाली. या प्रकरणात मनसेचे आमदार नितीन भोसले यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. मात्र, भोसले यांच्यासह तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला. पण, चांडक यांना पत्रकात आपले नाव परस्पर छापल्याचा जबाब नोंदवत या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला होता. जबाबानंतर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे बहुदा आरोपी म्हणून नाव वगळल्याच्या समजातून गाफील राहिलेल्या चांडक यांना बुधवारी रात्री अचानक अटक झाली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सत्ताधारी कॉँग्रेस आघाडी तसेच पालकमंत्री भुजबळ यांचाच हात असल्याचा आरोप करीत किरकोळ गुन्ह्यात रात्री अचानक अटक करण्यामागचे कारण काय, असा सवाल केला. या पार्श्वभूमीवर चांडक यांच्या जामिनानंतर पुन्हा मनसे व राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले.

दीक्षितांना सोडलेच कसे?
चांडक यांच्याबरोबर हेमंत दीक्षित यांचाही आरोपींमध्ये समावेश असून त्यांना अटक करण्याचे सोडून घाईत चांडक यांना पोलिसांनी अटक केलीच कशी, असा सवाल वसंत गिते यांनी केला.

मुळात मध्यंतरी एका प्रकरणात दीक्षित हे काही काळ पोलिसांच्या ताब्यात होते. त्यावेळी सातपूरमधील गुन्ह्यात त्यांना हस्तांतरित करता आले असते. चांडक यांना अटक केल्यानंतरही दीक्षित यांना अटक झाली नाही. चांडक यांच्या जामिनावर सुनावणी सुरू असताना गुरुवारी दीक्षित यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. एकूणच प्रकार लक्षात घेतला तर परस्परविरोधी न्याय पोलिसांकडून लावण्याची बाब संशयास्पद असल्याचे गिते यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले, तर पोलिसांचा वापर करून मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रकार चुकीचा असून, अशा कारवाईमुळे कार्यकर्ते कचरणार नाहीत, असे अतुल चांडक यांनी सांगितले.

भुजबळांकडून निषेध व चिमटेही
नाशिकमध्ये बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करतानाच मनसेच्या पदाधिकार्‍यांना चिमटेही घेतले. ते म्हणाले की, वसंत गिते यांनी मला अटक करून दाखवावी असे म्हटले. मात्र उगाच कोणाला अटक करून हीरो कशाला बनवायचे. मुळात सुडाचे राजकारण आपण कधीच केले नाही. शिवसेना सोडल्यावर घरावर ज्यांनी हल्ला केला त्यांना गृहमंत्री असताना पोलिस बळाचा वापर करून धडा शिकवू शकलो असतो. मात्र, तसे न करता कायदेशीर व न्यायालयीन मार्गानेच त्यांच्यावर कारवाई होऊ दिली. कोण पॉवरफुल हे जनताच ठरवेल. उगाच राजकीय स्टंट करून जनतेची दिशाभूल करणे सोपे नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

उर्वरित बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...