आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: कुठल्याही कलेचा जन्मच मुळात आश्चर्यातून होतो- अनिल अवचट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- माझ्या रेषांचा जन्म आश्चर्यातून होतो. खरंतर कुठल्याही कलेचा जन्मच मुळात आश्चर्यातून होतो, असं मला वाटतं. आपण जेव्हा ती कला आविष्कृत करत असतो तेव्हा माहिती नसते, तिचा आकार काय असणार आहे. मात्र, ती पूर्ण झाल्यावर आपल्या आश्चर्यालाच एक आकार आलेला असतो. असे मत लेखक अनिल अवचट यांनी त्यांच्या चित्रांबद्दल मांडले. कुसुमाग्रज स्मारकात समकालीन साहित्य उत्सवात अवचट यांच्या ‘माझी चित्तरकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन वनाधिपती विनायकदादा पाटील आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी समकालीनचे डॉ. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, संदीप कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी विनायकदादा मनोगतात म्हणाले की, स्वत:च्या आनंदासाठी चित्रे काढावी. अवचटांची दुर्लक्षित राहिलेली चित्रकार ही बाजूही समकालीनने प्रकाशात आणल्याने एक चांगलं साहित्य रसिकांना मिळालं आहे.
०बाबा, (अनिल अवचट) तुझ्या इतर पुस्तकांतील हे वेगळं पुस्तक आहे?

- हो. खरंतर मला चित्रांच फारसं कौतुक नव्हतं. सुहास कुलकर्णी आणि या लोकांनी ती कधीतरी बघितली आणि त्याला पुस्तकरूप दिलं. अनेक चित्र पेन्सिल स्केच आहेत. पण पेन्सिल आणि कलर यातील तरल भाव छापणं, फार अवघड पण प्रचंड कष्ट घेत या लोकांनीच त्याला आकार आणला.
०शाळेच्या चित्रकलेच्या बाहेर कधी आलास..?
-मला माझी चित्रकला आईकडून आली. जुन्या काळात फार जाच होत असे. पण माझी आई रोज सकाळी अंगणभर शेणसडा घालून त्यावर सुरेख रांगोळी काढत असे. ती रोज नवी रांगोळी काढत हे विशेष. ती जी एक रेघ ओढे त्या रेघेला डौल होता. आधी मी स्वत:च चित्र बघून कसं काढावं हे शिकलो. नग्न शरीर हे थेट आदीम शरीर असतं. हे मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा मी माणसं काढायला शिकलो. माझ्या चित्रांतील माणसांना तुम्हाला रेषावयव दिसतील. तीच आपल्याशी बोलू लागतील.एकच रेषा पूर्ण चित्र पूर्ण करते.
०अनेकदा चित्र एकसुरीपणा येतो. पण तुझी चित्र वेगळी दिसतात?
-आधीची रेघ ही नंतर डौल घेते. ती हुबेहुब कधीच येत नाही. खरंतर चित्र काय आहे त्यापेक्षा ते कसं काढलं आहे यालाही महत्त्व आहे. माझी कला पूर्ण को-या कागदाच्या लायकीची आहे असं मला कधी वाटलंच नाही. एका बाजूला काहीतरी खरडलेल्या कागदावरच मला लिहिण्याची आणि रेखाटण्याची सवय आहे. एका रेषेला हेलकावा दिला, तरी त्यातून एक वेगळाच मूड तयार होतो. हे काही आपण आधी ठरवलेले नसते की, असा मूड आपल्याला रेखाटायचा आहे. त्यामुळेच, तर मला असं वाटतं की, एकदा आपण चित्र काढलं की, ते आपलं राहतच नाही.
०‘खरं चित्र’ याची तू काय व्याख्या करतोस?

-जे मनापासून येतं. नकळत येत ते खरं चित्र असं मला वाटतं. एखाद्या रेषेला ते सामावून घेतंय का? नसेल येत तर ते आव्हान मला स्वीकारायला आवडतं. नकळत ते थेट आतून येतं. आपण ते काढतंच नाही. म्हणूनच मी माझ्या कोणत्याही चित्राखाली सही कधीच करत नाही. एवढा सुंदर निसर्ग आपण रेखाटावा मग त्यात आपलं नाव हवंय कशाला?
०तुझ्या चित्रांत झाडांची पानं बरीच दिसतात?
-झाडं, फुलं, पान यात पान या प्रकाराविषयी मला प्रचंड आकर्षण आहे. त्यातील रेघा मस्त असतात. त्या माझ्याशी बोलतात.
०माणूस आणि निसर्ग हे तुझे विषय
-माणूस हा निसर्गच आहे. तो निसर्गात जातो तेव्हा खूप काही शिकतो. मलातर निसर्गात गेल्यावर कधी आपलं अस्तित्व खूप लहान आहे, तर कधी फार मोठ्ठ असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला निसर्गात गेल्यावर आश्चर्य वाटायचं थांबत नाही.

ही मुलाखत उत्तरोत्तर अशीच रंगत गेली.संवाद सुरू असतानाच स्क्रीनवर अवचटांची चित्रेही रसिकांना बघायला मिळत होती. लक्षवेधी ठरली चित्र...! माणसाचं चित्र, डोके, हातातून दिसणारं झाड, ढगांवर नाचणारी माणसं, माणूसच एखादं झाड असणं, मोराच्या विविध छटा अशी अनेक लक्षवेधी चित्र रसिकांनी भुवया उंचावायला लावत होती.