आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांचा आज शहरात संप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शाळांमधील विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांच्या राष्ट्रवादीप्रणित र्शमिक रिक्षा-टॅक्सीचालक आणि मालकांच्या संघटनेतर्फे सोमवारी (दि. 4) संप पुकारण्यात आला आहे. यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना पोहोचविण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या एका पदाधिकार्‍याने त्याचे बळ अजमावून पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा, टॅक्सीचालक-मालकांच्या मोर्चाचे आयोजन केल्याची चर्चा शहरात रविवारी होती. दोन पक्षांच्या राजकारणात विद्यार्थी आणि पालक विनाकारण भरडले जाणार असल्याचा सूरदेखील पालकांनी व्यक्त केला आहे. महिन्याभरापासून आरटीओ आणि पोलिसांतर्फे 300 रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ संघटनेतर्फे भालेकर मैदानापासून आरटीओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक र्शमिक सेनेचा सहभाग राहणार असल्याचेही संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे. हा मोर्चा शक्तीप्रदर्शन नसल्याचेही संघटनेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

केवळ सात रिक्षांवरच कारवाई
अनधिकृत वाहनांच्याबाबत नेहमीच कारवाई केली जात असते. मात्र विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षांबाबत केला गेलेला आरोप अयोग्य आहे. आम्ही केवळ सात रिक्षांवरच कारवाई केली आहे. त्यातही पालकांनीदेखील योग्य खबरदारी घेऊन वाहतूकीची व्यवस्था केल्यास त्यांच्याच बालकांची शालेय वाहतूक सुरक्षित होऊ शकणार आहे.
-चंद्रकांत खरटमल, प्रादेशिक परिवहन अधिकारी

फार जोखीम नको
आमच्या शाळांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी सायकलने आणि पालकांच्या वाहनांवर येत असतात. तसेच कोणत्याही संपात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याबाबत काळजी घेतली जाते. त्यामुळे जे विद्यार्थी रिक्षांवरच अवलंबून असतील, त्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत आणले-नेले तर ठीक; अन्यथा फार जोखीम घेण्याची आवश्यकता नाही.
-प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष, नाएसो

पालकांना विनाकारण जाच
राजकारण्यांच्या वैयक्तिक हेव्यादाव्यांमध्ये विद्यार्थी आणि पालक भरडले जाऊ नयेत. या मोर्चामुळे अनेक विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्यास त्याची जबाबदारी कुणावर, असादेखील प्रश्न आहे. तसेच पालकांना विनाकारण कार्यालयांच्या वेळेत बालकांना ने - आण करण्यासाठी धावपळ आणि मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
-संजय महाले, पालक

शिवसेनेचा नाही बंदमध्ये सहभाग
शिवसेनेशी निगडित कोणत्याही संघटनेने आणि रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या सभासदांनी या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक आणि शालेय प्रशासनाची गैरसोय होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

पालकांचा नाराजीचा सूर
सोमवारी शहरातील अनेक बालकांना त्यांचे रिक्षावाले काका घ्यायला येणार नसल्याने पालकांना ऐन घाईच्या वेळी बालकांना शाळेत पोहोचविण्याची आणि घरी परत आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे महानगरातील अनेक पालकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.