आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात रिक्षामीटरच्या कृत्रिम टंचाईमुळे वादावादी; विक्रेत्यांविरोधात संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीचा फायदा उचलत मीटरच उपलब्ध नसल्याचे सांगणार्‍या विक्रेत्यांच्या विरोधात संताप उफाळून आल्याने मखमलाबाद नाक्यावरील दुकानात वादावादी आणि हाणामारीची स्थिती गुरुवारी निर्माण झाली. एका मीटर विक्रेत्याकडे आलेल्या कंपनीच्या अधिकार्‍यालाच रिक्षाचालकांनी घेराव घातल्यानंतर त्याने कशीबशी सुटका करून घेत तिथून काढता पाय घेतल्याने अनर्थ टळला.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी प्रत्येक रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे केल्यापासून अनेक विक्रेत्यांकडे मीटर संपले असल्याची उत्तरे रिक्षाचालकांना मिळत आहेत. तसेच मीटर कधी येईल, अशी विचारणा केल्यावर पुढच्या आठवड्यात किंवा चार-पाच दिवसांत, अशी उत्तरे दिली जात आहेत. रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटरची किंमत 2200 रुपये असताना प्रत्यक्षात बहुतांश विक्रेत्यांकडून 2800 ते 3500 रुपये आकारले जात आहेत. एक हजारहून अधिक रुपयांची अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याचे आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे लक्षात आल्याने गुरुवारी मखमलाबाद नाक्यावरील दुकानाबाहेर तणाव निर्माण झाला होता. विक्रेत्याच्या दालनाबाहेरच हमरीतुमरी होऊन अधिकार्‍याला घेराव घालण्यात आला. प्रकरण बरेच हातघाईवर आल्यानंतर त्या अधिकार्‍याने गाडीतून तिथून निघून जाण्याचा मार्ग पत्करल्याने पुढील बिकट परिस्थिती टळू शकली.


तब्बल नऊ कंपन्यांच्या मीटरना आहे परवानगी
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यासाठी मीटर उत्पादक नऊ कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात नाशकात सर्वाधिक चालणारे सॅनसुई, दिघे आणि स्टॅण्डर्ड यांच्यासह सुपर, ग्लोबल, फोनिक्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. या प्रत्येक कंपनीचे तीन ते सात विक्रेते नाशिक शहरात आहेत. त्यामुळे नाशकातील रिक्षाचालकांनी कोणत्याही एकाच कंपनीच्या मीटरसाठी थांबून राहण्यापेक्षा उपलब्ध असलेले इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून घेण्याचा सल्ला परिवहन विभागातर्फे देण्यात आला आहे.

तक्रार आल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई
आम्ही गुरुवारीच सर्व मीटर विक्रेत्यांची बैठक घेतली होती. त्यात झालेल्या चर्चेतून मीटर कमी पडणार नसून, आता 1800 मीटर उपलब्ध असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच, त्या बैठकीतच कोणतीही जादा रक्कम न घेता मीटर देण्याचे आदेश दिले असून, तक्रार आल्यास कठोर कारवाईचा इशारादेखील विक्रेत्यांना देण्यात आला आहे.
-सुभाष पेडामकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

गुरुवारीच झाली होती बैठक
रिक्षाच्या मीटरच्या सक्तीनंतर ऐनवेळी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गुरुवारीच आरटीओ कार्यालयाकडून नऊ कंपन्यांच्या विक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात सॅनसुई कंपनीच्या विक्रेत्याने 900 मीटर, दिघेच्या विक्रेत्याने 100 मीटर आणि अन्य कंपन्यांच्या काही विक्रेत्यांनी सुमारे 800 मीटर अशी सुमारे 1800 मीटर उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे टंचाई निर्माण होणार नाही, असा शब्द परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना विक्रेत्यांकडून देण्यात आला होता.

मिळेल त्या भावात मीटर घ्यावे लागत आहेत
अनेक विक्रेत्यांकडे जाऊन आलो; मात्र मीटरच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विनाकारण दंड होण्याच्या भीतीने रिक्षाचालकांना मिळेल तिथून आणि मिळेल त्या भावाने मीटर घ्यावे लागत आहेत. तसेच, एकाही रिक्षाचालकाला मीटर खरेदी केल्याची पावती दिली जात नाही.
-सुनील डुक्की, रिक्षाचालक