आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजरोडवर पोलिसांसमोर रिक्षाचालकांची ‘शायनिंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहर परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होणा-या वाहतूक कोंडीला कॉलेजरोडदेखील अपवाद राहिलेला नाही. महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच लागलेल्या रिक्षांच्या रांगा व सकाळच्या वेळी थेट पोलिसांसमोरच सुरू असलेली रिक्षाचालकांची शायनिंग सोमवारीही दिसून आली.
रिक्षाचालकांची मग्रुरी वाढत असून, यापूर्वी त्यांच्याकडून पोलिसांच्या अंगावरच रिक्षा घालण्याचे प्रकार घडले आहेत. सोमवारी दुपारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने कॉलेजरोड, वॉलमार्ट चौक भागात पाहणी केली असता, महाविद्यालयांच्या तीनही प्रवेशद्वारांवर रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. एवढेच नव्हे, तर एचपीटी-बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा आडव्या-तिडव्या उभ्या केलेल्या होत्या.

कानात बाळी, गणवेश व बिल्ल्याचा विसर
कॉलेजरोड, द्वारका, सीबीएस, शालिमार चौकातील बहुतांश रिक्षाचालक त्यांच्या खाकी गणवेशाऐवजी रंगीबेरंगी कपडे घालून हातात कडे, गळ्यात रूमाल अडकवून कानात बाळी, मोठे केस अशा सिनेमास्टाइल भूमिकेत वावरत असतात. कुठल्याही रिक्षाचालकाने बिल्ला लावलेला नसतो. काही रिक्षाचालक तर चौकातच पोलिसांसमोर हातात सिगारेट घेऊन प्रवासी गोळा करताना दिसतात. कायद्याचे सर्रास उल्लंघन करणा-या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करणे तर दूरच, पण त्यांना साधी शिस्त लावण्याचे धाडसही ते दाखवत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
राष्‍ट्रवादी काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात
‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘मग्रुर रिक्षाचालक, बेफिकीर पोलिस’ या मालिकेंतर्गत सोमवारी पंचवटी कारंजा पोलिस चौकीसमोरच सुरू असलेली रिक्षाचालकांची मग्रुरी छायाचित्रासह प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे विभागीय अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी सहायक आयुक्त (वाहतूक) बागवान यांना निवेदन दिले. यात, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा व निमाणी बसस्थानकाबाहेर रस्त्यावरच रिक्षाचालकांनी अनधिकृत थांबे निर्माण केले आहेत. विशेषत: पोलिस चौकीसमोरच रिक्षाचालक प्रवासी भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. याकडे वाहतूक तातडीने पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आल आहे. रिक्षाचालकांवर कारवाई न केल्यास राष्‍ट्रवादी बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रमोद बोरसे, मधुबाला भोरे, किशोर पारखे, संतोष खैरनार आदी उपस्थित होते.