आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक तारा’ लखलखला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘आला-पाहिलं अन् जिंकलं’ असं यश लाभलेल्या अवखळ अवधूत गुप्तेने नाशिककरांची शनिवारची सायंकाळ संगीताच्या मेजवानीने रसरशीत व बहारदार केली. निमित्त होते ‘दिव्य मराठी’ आणि पुष्पक आयोजित ‘एक तारा-संगीत रजनी’ या दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित धमाकेदार कार्यक्रमाचे.

‘एक तारा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत व इतर कलाकारांनी नाशिककरांना आपल्या गाजलेल्या गाण्यांवर केवळ ठेकाच धरायला लावला नाही, तर नव्या चित्रपटातील गाण्यांचे पहिले र्शोते होण्याचा मानही त्यांना दिला. ‘गणाधिशा भालचंद्रा’ म्हणत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत अवधूतने संगीत रजनीची दणकेबाज सुरुवात केली. त्याची सुपरहिट ठरलेली गाणे ऐकताना रसिकांनी टाळ्या-शिट्यांचा अक्षरश: पाऊस पाडला. ‘तुझे देखके मधुबाला, मेरा मन ये पागल झाला’ म्हणत त्याने सारेगमप फेम अनिरुद्ध जोशीबरोबर ‘परी म्हणू की सुंदरा’ या गाण्यावर ताल धरला. ‘झपाटलेला 2’मधील ‘चटक लावून वेड्या जिवाला’ हे गाणे गाऊन आरोही म्हात्रे-सक्सेनाने रसिकांसमोर मदनिकाच उभी केली. ‘सॉरी राँग नंबर’ हे अत्यंत तरल व अवीट गाणे सादर करून अवधूतने विरहव्याकूळ रोमान्सचा कातर माहोल निर्माण केला. मुग्धा कराडेने ‘ही गुलाबी हवा’, तर अनिरुद्ध जोशीने ‘राधा ही बावरी’ सादर करून रसिकांची दाद मिळवली. ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे-पोहे’ म्हणत त्याने सनई-चौघडे चित्रपटाच्या आठवणी जागवत चित्रपटाचे दिग्दर्शक कै. राजीव पाटील यांना ते सर्मपित केले. अवधूतने ‘पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही’ या भावपूर्ण गीताने सर्व प्रेक्षकांना व्याकूळ करून टाकले. त्यानंतर एक तारा चित्रपटातील ‘अथ तुची, इती तुची, तुची दावी वाट देवा’ हे गीतही सादर केले. त्यानंतर अवधूत व अनिरुद्ध जोशी यांनी ‘मेरे मालिक, मेरे मौला, मेरे मोरया’ ही अनोखी कव्वाली सादर करत रसिकांची दाद मिळवली. या वेळी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, युनिट हेड मदनसिंग परदेशी, पंकज पिसोळकर आदी उपस्थित होते.

संतोष म्हणाला, ‘सारे र्शेय अवधूतचे’
संतोष जुवेकरने अवधूत गुप्ते यांच्या लवकरच येणार्‍या ‘एकतारा’ या चित्रपटातील ‘रुबाब मारतोय सोन्यावानी’ हे गाणे साभिनय सादर करताच प्रेक्षकांनी त्यांना जागेवरून उठून स्टेजसमोर फेर धरत दाद दिली. या वेळी संतोषने त्याच्या झेंडा’ चित्रपटातील संत्याभाई ते ‘एकतारा’मधील माउली या प्रवासाचे सारे र्शेय अवधूत गुप्ते यांनाच असल्याचे सांगितले.