आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avinash Gosavi Article On Disha Swayam Prernechi

दिशा : स्वयंप्रेरणेची...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - "दिशा' या अभ्यासातून युवावर्गाला प्रेरणा मिळावी.प्रेरणेतून झालेला प्रवास जीवनाला योग्य दिशा देतो. मनात प्रेरणा निर्माण होणे महत्त्वाचे आहे. प्रेरणेची ताकद प्रचंड आहे. प्रेरणेच्या सामर्थ्यावर तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करता येते. स्वयंप्रेरणा प्राप्त झाली की अपेक्षित मार्गक्रमण नक्कीच होते. आज आपण अभ्यासत आहोत दिशा स्वयंप्रेरणेची...
अनुभव हा जगातला श्रेष्ठ शिक्षक आहे. विवेकानंद म्हणतात, "जीवनातील हास्य आणि अश्रू या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला खरं शिक्षण मिळतं.' माणूस विद्यार्थिदशेतून वाटचाल करत असताना मोठा भविष्यकाळ त्याच्यासमोर असतो. या भविष्यकाळाची सुयोग्य तरतूद करण्याचा प्रयत्न तो विद्यार्जनाच्या माध्यमातून करत असतो. आयुष्यात नेमकं काय काम करायचं, याचा निर्णय विद्यार्थ्याला घ्यायचा असतो. या निर्णयावर त्याचा आयुष्यातील पुढील प्रवास अवलंबून असतो. नेहमीच नाही, पण बऱ्याचदा तुमचं आर्थिक साधन या निर्णयाशी निगडित असतं. अनेक आशा आणि अपेक्षा माणसाला असतात. यामध्ये तुमच्यावर असणाऱ्या जबाबदारीचं प्रतिबिंब पडत असतं. अर्थात तुम्ही जबाबदारीने विचार करत असाल तर...
साधनांची सहज उपलब्धता जीवनात आनंद निर्माण करते. पुढील मार्गक्रमण सोपं होतं. साधनांची कमतरता माणसाला सखोल विचार करण्यास शिकवते. प्रसंगी त्याच्या डोळ्यांत अश्रू आणते. गरजांच्या पूर्ततेचे साधन पैसा आहे, हे वास्तव आहे.

मी खूप यशस्वी होईल, असा विचार युवावर्गाच्या मनात नेहमीच असतो. शिक्षणाने स्वत:चा जीवनस्तर उंचावण्याचा निर्णय ज्या दिवशी विद्यार्थी घेतो, तो दिवस त्याच्यासाठी भाग्याचा असतो. या निर्णयात त्याचं भाग्य सामावलेलं असतं. या दिवशी त्याला गवसते दिशा स्वयंप्रेरणेची.

स्वयंप्रेरणा म्हणजे निश्चित अशा कार्यऊर्जेची प्राप्ती. स्वत:च्या निर्णयाची जबाबदारी घेतली की तळमळीने अभ्यास केला जातो. भ्रामक कल्पना लोप पावतात. अभ्यासाची दिशा सुस्थापित होते. ध्येय ठरलं की, श्रमाचा आनंद मिळतो. ध्येयाच्या दिशेने पाऊल पुढे पडत राहतं. ज्या ठिकाणाहून तुम्ही सुरुवात करत आहात त्याप्रमाणे तुमचं ध्येय असतं. स्वयंप्रेरणा आणि स्वयंशासन या दोन घटकांशी स्वयंविकास जोडलेला असतो.

स्वयंप्रेरणेच्या दिशेने वाटचाल केल्यास काय घडू शकतं, याचं उदाहरण आपण पाहू.
राजू नावाचा विद्यार्थी. घरातल्या परिस्थितीचा त्याच्या मनावर सखोल परिणाम होत असतो. कुटुंब मोठं असतं. या कुटुंबात सावत्र भावंडांचाही वावर असतो. वडील साधी नोकरी करणारे. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून आई शेतमजुरी करणारी. घरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्ण अभाव असतो.

चंदू हा राजूचा अतिशय जवळचा मित्र. जिवाला जीव देणं या शब्दार्थाची प्रचीती म्हणजे त्यांची मैत्री. गल्लीतल्या पाच सहा मित्रांचा समूह म्हणजे त्यांचं जग. हे जग जागत राहायचं. रात्रीच्या वेळी पारावर, ओट्यावर बसून गप्पा रंगायच्या. कधी-कधी पहाट होऊन जात असे. झोपताही मन विसावून जायचं. राजे शिवछत्रपती म्हणजे या मित्र मंडळाचं दैवत. त्यांच्या क्रिकेटच्या टीमचं नाव होतं, जय छत्रपती शिवाजी क्रिकेट टीम. सिनेमा असो की कोणताही कार्यक्रम, सर्वांची एकत्र उपस्थिती हे या ग्रुपचे वैशिष्ट्य.

राजू दहावी पास झाला. सुटीत एका कार्यालयात काम करू लागला. कधीतरी क्रिकेटच्या सामन्याचा मोह व्हायचा. कामाला दांडी पडायची. सामना तर जिंकला, पण पैशांचे नुकसान झालं, ही बोच संध्याकाळी मनात रुतून जायची. बहिणीही कांदे काढणीला शेतावर जात असत.
अशा परिस्थितीत राजू त्याचं ध्येय निश्चित करतो प्राध्यापक वा शिक्षक होण्याचं. भरपूर अभ्यास करतो. नकारात्मक स्थितीचं कारण पुढे करता तो निश्चय करतो. स्वयंप्रेरणा त्याच्या मनात कार्यरत झालेली असते. त्याने दिशा स्वयंप्रेरणेची स्वीकारलेली असते. बारावी पास होतो. इतकं शिक्षण घेतलेला राजू घरातला पहिला व्यक्ती. कुठेतरी छोटी नोकरी करावी, असा विचार घरातून मांडला जातो. पण, राजू शिकण्याचा निर्णय पक्का ठेवतो. पदवीधर होतो.
शिक्षणशास्त्रातली पदवी मिळवितो. एम.ए.ची परीक्षा पास होतो. नोकरी सहजपणे मिळत नाही. मित्र त्याला म्हणत असत, सरांना फारच स्ट्रगल करावं लागतंय. थोडी उशिरा त्याला शिक्षकाची नोकरी मिळते. आज तो अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवितो आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वयंप्रेरणेने आपला जीवनस्तर बदलण्यात तो यशस्वी होतो. स्वयंप्रेरणेचा उपयोग करण्यास आपणही शिकूया..!