आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजूंची मदत हीच श्रीमंती- महापौर अशोक मुर्तडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - समाजातील दीनदुबळे गरीब रुग्णांची सेवा करणे मोलाचे कार्य आहे. निःस्वार्थी भावनेतून असे कार्य करणारेच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निर्मला लोककल्याण प्रबोधिनी यांच्या वतीने रविवारी लायन्स क्लब सभागृहात निर्मला पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापाैर मुर्तडक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पायाभूत सुविधांसह आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आदिवासी पाड्यांवरील लाेकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याच्या कार्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. तसेच, काही आदिवासी पाड्यांवर अशुद्ध पाणी येत असल्यामुळे त्यांच्या अारोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही समाजातील घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापुढील काळात निर्मला लोककल्याण प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या मदतीने अशा पाड्यांवरील लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर यांनी सांगितले की, नेत्रसेवा करण्याची संधी मिळणे हा एकप्रकारचा सन्मानच आहे. आठवड्यातील पाच दिवस प्रॅक्टिस आणि दोन दिवस गरीब, दुर्बल, असहाय रुग्णांसाठी दिले पाहिजे, हा संदेश सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचला पाहिजे. जेणेकरून खालच्या स्तरापर्यंत मदत पोहोचू शकेल. सोहळ्यावेळी डॉ. शरद पाटील, निर्मला लोककल्याण प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बिर्ला, प्रकल्प उपाध्यक्षा सराेज दायमा आदी मान्यवर उपस्थित होते.

यांचा झाला गौरव
निर्मलालोककल्याण प्रबोधिनीतर्फे समाजसेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९९७ सालापासून निर्मला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा बाळकृष्ण वाघेरे, डॉ. आरती काबरा, डॉ. भानुदास डेरे, डॉ. विजय बीडकर यांचा स्मृतिचिन्ह गौरवपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.