आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Purandare, Latest News In Divya Marathi

प्रतिभा अंतरंगातूनच येते- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-साहित्य निर्मितीसाठी आवश्यक प्रतिभा निर्माण होण्यासाठी ‘क्लास’ जॉइन करता येत नाही, तर ती अंतरंगातून यायला हवी. आजच्या पिढीचे साहित्य वाचताना तर भीतीचं वाटते, अशी खंत व्यक्त करत वेड लागल्याशिवाय साहित्यातून खरी आनंदप्राप्ती होत नाही, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सार्वजनिक वाचनालयाचा 174 व्या वार्षिकोत्सव सोहळ्यास सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते मराठी सारस्वतांचा विविध साहित्यकृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, नरेश महाजन, विनया केळकर, मिलिंद जहागीरदार, किशोर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारार्थींचे मनोगत : संकल्पना कोश खंडाला मिळालेला पुरस्कार ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे, असे सुरेश वाघे म्हणाले. देशभरातील 800 भाषा तर राज्यातील 60 भाषांचा सहभाग असलेला 54 खंडाच्या महाप्रकल्पाची दखल घेतली गेली हा मला आधुनिक ज्ञानमंदिराने दिलेला प्रसादच आहे, असे अरुण जाखडे म्हणाले. भौतिकशास्त्र व अध्यात्माची जाणीव देणार्‍या अनुवादित ग्रंथ वाचकांसाठी अतिशय माहितीपूर्ण आहे, असे अविनाश ताडफळे यांनी म्हटले. पोरक्या होत असलेल्या मराठी कथेला पुरस्कार देऊन सार्वजनिक वाचनालयाने एक व्यासपीठ दिले, असे सतीश तांबे म्हणाले. मराठीतील साहित्यसंपदा कमी होत चालल्याचे कृष्णात खोत म्हणाले, तर खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवून काम केल्यास व्यक्ती मोठय़ा होतील, असे मंगेश तेंडुलकर यांनी म्हटले.
मराठी सारस्वतांचा सन्मान
सावानातर्फे यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये सुरेश वाघे यांच्या ‘संकल्पना कोश खंड : 1 ते 5’ यास डॉ. वि. म. गोगटे, तर कृष्णात खोत यांच्या ‘उमेदीने लेखनासाठी’ यास डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, मंगेश तेंडुलकर यांच्या ‘संडे मूड’ यास विमादी पटवर्धन, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या अरुण जाखडे यांच्या महाराष्ट्र खंडास मु. ब. यंदे पुरस्कार, तर पु. ना. पंडित पुरस्कार ‘मॉलमध्ये मंगोल’ या कथासंग्रहाचे लेखक सतीश तांबे यांना देण्यात आला. तर स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार ‘भौतिकशास्त्र आणि अध्यात्म’ या पुस्तकाचे लेखक अविनाश ताडफळे यांना, तर कै. धनंजय कुलकर्णी (अनुवादासाठी) हा पुरस्कार महाबळेश्वर सैल यांच्या ‘तांडव’ या कादंबरीस प्रदान करण्यात आला. महाबळेश्वर सैल यांच्या वतीने हा राजहंस प्रकाशनचे पंकज क्षेमकल्याणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘जाणता राजा’वर लिखाण झाले नाही
मराठी साहित्याचे प्रचंड वेड लागल्याशिवाय इतिहास जन्माला येणे कठीण आहे, असा अनुभव सांगत इतिहास अन् सत्य घटना व पात्रांवर आधारित ‘जाणता राजा’ या नाटकाचे 1984 ते 2014 या काळात तब्बल 1250 प्रयोग पूर्ण झाले असून, त्यातून खर्च वजा जाता 19.50 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. मराठी साहित्यातील प्रतिभेचा यशस्वी प्रयोग सर्वांसमोर उलगडून सांगतानाच पुरंदरे यांनी एक महत्त्वाची खंत व्यक्त करीत या नाटकावर लिखाण झाले नसल्याचे सांगितले.