आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachelor Of Pharmaceutical Science News In Marathi, Online, Career, Divya Marathi

दिव्य मराठी इम्पॅक्‍ट: ‘बी.फार्म’साठी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र बदलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या (बी. फार्म) प्रथमच घेण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळालेले पुण्याचे केंद्र बदलण्यात येत असून, विद्यार्थ्यांना आता स्थानिक (पर्याय दिलेले) केंद्र मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी इतर शहरांतील केंद्र मिळाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांना ही परीक्षा कशाप्रकारे अडचणीची ठरणार आहे याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत तंत्रशिक्षण संचलनालयाकडून हॉल तिकिटांमध्ये दुरुस्ती केली जात असल्याने विद्यार्थ्यांना आता स्थानिक केंद्र मिळणार आहे.
नाशिकच्या बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी थेट पुण्याचे केंद्र गाठावे लागणार होते. परंतु, विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने तंत्रशिक्षण संचलनालयाने केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी काही विद्यार्थ्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे. त्यामुळे 20 व 21 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता विद्यार्थ्यांना स्थानिक केंद्रावरच देता येणार आहे. दि. 15, 16 व 17 एप्रिल रोजी हॉल तिकीट मिळणार आहे. त्यात दुरुस्ती करून विद्यार्थ्यांनी दिलेले केंद्र दर्शविण्यात येईल.

स्थानिक केंद्र मिळाले
ऑनलाइन प्रवेशपरीक्षेसाठी सुरुवातीला पुण्यातील सिंहगडचे केंद्र मिळाले होते. परंतु, आता नाशिकचे स्थानिक केंद्र मिळाल्याने पुण्याला जावे लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडणार नसून अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल. ऐश्वर्या शिंदे, विद्यार्थिनी


हॉल तिकिटाची दुरुस्ती सुरू
बी. फार्मच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना स्थानिक केंद्रावरच परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी हॉल तिकिटांमध्ये दुरुस्ती करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना एसएमएसही पाठवले जात आहेत. डॉ. एस. के. महाजन, संचालक, तंत्रशिक्षण संचलनालय, मुंबई