आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआय रुग्णालयाची दुरवस्था, अाराेग्य सचिव साैनिक संतापल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - औद्योगिक कामगारांना तत्काळ आरोग्य सेवा देणारे ईएसआय रुग्णालय मृत्यूशय्येवर असल्याची गंभीर बाब आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांच्या पाहणी दौऱ्यात उघडकीस आली. रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबात संताप व्यक्त करत ‘हे रुग्णालय आहे की उकिरडा’अशा शब्दात सौनिक यांनी रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. दौऱ्याच्या वेळी ईएसआयचे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने संतापात आणखीच भर पडली.
आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता साैनिकांनी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर शनिवारी सायंकाळी ईएसआय हॉस्पिटलची पाहणी केली. सचिव येणार असल्याचे माहिती असूनदेखील ईएसआयचे एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने सौनिक यांच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली. सर्वत्र अस्वच्छता, खाटा तुटलेल्या, दाखल एक-दोन रुग्णांवर उपचार करण्यास परिचारिका नसल्याने नातेवाइकांकडून रुग्णांची सुश्रूषा केली जात असल्याचे निदर्शनास आले. प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या लिफ्टची भिंत संरक्षक जाळ्यांची पिंकदाणी झाल्याने सौनिक यांनी हे रुग्णालय अाहे की उकिरडा, अशा शब्दात या रुग्णालयाचे वाभाडे काढले. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही सौनिक यांनी दिले. सौनिक यांच्यासमवेत राज्याचे सहसंचालक डॉ. बी. डी. पवार, उपसंचालक डॉ. सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. जी. एम. होले, डॉ. कपिल आहेर, अवर सचिव प्रकाश इंदुलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, डॉ. सुशील वाक‌्चौरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, ईएसआयचे वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारीही उपस्थित नव्हते.

रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा’
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहत कामगारांसाठी ईएसआय रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार होत नसल्याने बहुतांशी कामगार रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेतात. कामगारांसाठी असलेल्या या दवाखान्यात एकही गंभीर शस्त्रक्रिया झाली नाही. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना शासन फुकट पोसत असल्याने हे रुग्णालय शासनासाठी आणि कामगार रुग्णांसाठी ’असून अडचण नसून खोळंबा’ याप्रमाणे झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...