आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांची वहिवाट.. वाहनांचीही ‘वाट’ ; शिर्डी-सप्तशृंगी दर्शनासाठी येणा-या भाविकांनाही त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांवर पावसामुळे अनेक छोटे-मोठे खड्डे पडल्याने रस्तेच खड्ड्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणारा तालुका म्हणून दिंडोरी तालुक्याची ओळख आहे. गुजरात राज्यातील भाविक शिर्डी व सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नेहमीच ये-जा करतात. परंतु, गुजरात राज्य ओलांडताच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे आपण महाराष्ट्रात आलो आहोत, याची जाणीवही त्यांना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे होते. त्यामुळे भाविकांना या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

दिंडोरी पूर्व भागातील दिंडोरी ते मोहाडी पिंपळगाव हा निफाड व दिंडोरी या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली असल्याने वाहनधारकांना या रस्त्याने वाहन चालविणेही कठीण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही त्या रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष दिले नाही. लखमापूर फाटा ते पिंपळगाव रस्त्याची तशीच परिस्थिती असून, पिंपळगाव येथील टोलनाका वाचविण्यासाठी वाहनधारक या रस्त्याचा उपयोग करतात. त्यामुळे या रस्त्याच्या वाहतुकीत वाढ झाली असूनही या रस्त्याचे काम न झाल्याने या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

गाडी चालवणेही कटकटीचे
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. गाडी खड्ड्यात गेली की पावसाचे पाणी हे शेजारी ये-जा करणा-या वाहनांवर उडते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये कटकट होऊन भांडणेही होतात. खड्डा टाळण्यास गेले तर समोरील वाहनधारकांवर गाडी जाते की काय असे वाटते. त्यामुळे वाहन चालविणेही कटकटीचे बनले आहे. पालखेड औद्योगिक वसाहतीतून नेहमीच अवजड वाहनाची ये- जा सुरू असते. त्या अवजड वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी चार पदरी रस्त्यांची आवश्यकता आहे. परंतु येथील रस्ता हा फक्त एकेरी वाहतुकीचा असल्याने ओव्हरटेक करतानाही वाहनचालकांना कटकटीला सामोरे जावे लागत आहे.

पावसाने दर्जा आणला उघडकीस
- लखमापूर फाटा ते वरखेडा या रस्त्यासह तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. ज्या काही नवीन रस्त्यांची कामे झाली आहेत, त्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा पावसामुळे उघडकीस आला आहे. फक्त रस्ते मंजूर म्हणून लोकप्रतिनिधी गाजावाजा करतात; परंतु गेल्या दहा वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. कैलास बलसाणे, नागरिक, वरखेडा
पाऊस उघडताच कामे सुरू करू
- आदिवासी उपाययोजना या अंतर्गत रस्ते दुरुस्ती विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन व नाबार्ड अंतर्गत जे रस्ते मंजूर आहेत, त्यांचे अंदाजपत्रक निविदा स्तरावर आहे. पाऊस उघडताच कामे सुरू करण्यात येतील. आर. डी. आढाव, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिंडोरी

20 किलोमीटर रस्त्यासाठी पाऊण तास
मोहाडी ते नाशिक हे म्हसरूळमार्गे सुमारे 20 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर पार करण्यासाठी मोहाडी ते आंबेदिंडोरी हा सहा किलोमीटर रस्ता अतिशय खराब असल्यामुळे हे अंतर चालण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागतात व आंबे ते नाशिक 14 कि.मी. रस्ता चांगला असल्यामुळे हे अंतरासाठी फक्त 10 मिनिटे लागतात. खराब रस्ता असल्याने 20 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास घालवावा लागत आहे.