आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bad Situation Of Superspecilaty Hospital Of Health University

सुपरस्पेशालिटी’ची दैना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य विद्यापीठाकडे हस्तांतरित करायचे की ते सद्यस्थितीप्रमाणेच आरोग्य विभागाकडेच कायम ठेवायचे, या वादात नाशिकच्या संदर्भसेवा रुग्णालयाचे प्रश्न ‘जैसे थे’ ठेवण्यातच आरोग्य विभागाला आनंद असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र रुग्णालयातील सेवांचे परिपूर्ण संदर्भ अद्यापही लाभू शकलेले नाहीत.

प्रत्येक मेडिकल कॉलेजला 500 खाटांचे हॉस्पिटल जोडून असल्यास त्यास मान्यता देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. परंतु, आरोग्य विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयास हॉस्पिटलच नसल्याने त्यांच्यातर्फे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल विद्यापीठाकडे देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यात खो घालत आरोग्य विभागालाच मेडिकल कॉलेज उभे करायचे असल्याचे सांगून या हॉस्पिटलच्या हस्तांतरणास विभागाने नकार दिला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची मखलाशी
आरोग्य विभागाला नाशिकमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करायचे झाल्यास जागेपासून अनेक बाबींसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा कारभार स्वत:कडेच ठेवल्याने सर्वप्रकारची खरेदी व अन्य बाबी आपल्याकडेच राखण्याचा डाव आहे.

निधीची कमतरता कायम
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील उपचार, शस्त्रक्रिया व औषधांसाठी वार्षिक पाच कोटींचा निधी लागतो. मात्र, आरोग्य विभागाकडून एकदाही तेवढा निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबतची खरेदी टप्प्याटप्प्याने करावी लागते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा हक्कदेखील सोडायचा नाही आणि आवश्यक साधनांची पुरेशी उपलब्धतादेखील करून द्यायची नाही, असेच धोरण आरोग्य विभागाचे दिसते.

नाशिकचा समावेश का नाही?
आरोग्य विभागाला नाशिकमध्ये मेडिकल कॉलेज सुरूकरायचे होते, तर नुकत्याच मंजूर झालेल्या सात वैद्यकीय कॉलेजच्या यादीमध्ये नाशिकचे नाव का नाही? संदर्भसेवा रुग्णालय हातून गेल्यास सर्व ‘सुपरपॉवर’ हातातून जातील, या भीतीपोटीच ते आरोग्य विद्यापीठाकडे हस्तांतरित केले जात नसल्याचाच ‘संदर्भ’ त्यातून निघत आहे.