आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ दहा घुसखोरांची बांगलादेशात रवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - मुसळगाव येथील अवैध व्यवसायावरील धाडीत आढळून आलेल्या दहा बांगलादेशी घुसखोरांची सरहद्दीवर जाऊन यशस्वी पाठवणी करण्यात आली. मात्र, त्या विषयीचे सोपस्कार पूर्ण करतांना पोलिस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. दोन्ही बाजूंनी झालेला तब्बल 85 तासांचा प्रवास आणि 11 दिवसांचा कालावधी पार करून पोलिस पथक रविवारी रात्री सिन्नरला परतले.
सहा महिला आणि चार पुरुष असे दहा बांगलादेशी असून, ते अवैधरित्या देशात रहात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मात्र, अटक झाल्यापासून तुरुंगात असल्याचा कालावधी शिक्षेच्या कालावधीत गृहीत धरण्यात आल्याने शिक्षा सुनावल्यापासून आठवडा भरातच त्यांची सुटका झाली. त्यांची बांगलादेशात पाठवणी करण्याच्या हुकूमाची पोलिसांनी तामिली केली.सिन्नरहून पाठवण्यात आलेल्या दहा बांगलादेशीं सोबत लातूरहून आलेल्या तीन महिलांची भर पडली.
क्लिष्ट सोपस्कारांचा पहिला अनुभव - घुसखोरांची पाठवणी करण्याची पहिलीच घटना असल्याने पोलिसांना सोपस्काराचे अडथळे पार करावे लागले. उपनिरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर येथील प्रीतम लोखंडे आणि सचिन पिंगळ या सह जिल्हा मुख्यालयातील चार पुरुष व सहा महिला कर्मचार्‍यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली. अटकेच्या तारखेत फरक असल्याने 22 जून रोजी चार पुरुषांची नाशिक मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतरही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांच्यासाठी काढलेल्या मनाई हुकूमाद्वारे त्यांना पोलिस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आले. 25 जून रोजी सहा महिलांची सुटका झाल्यानंतर पोलिस पथकाने सर्वांना घेऊन बंगालच्या दिशेने रेल्वेने प्रयाण केले. 43 तासांच्या प्रवासानंतर हावडा स्टेशनवर पश्चिम बंगाल पोलिसांच्या सहकार्याने पुढील सोपस्कार सुरू झाले. 1 जुलै रोजी सुमारे 125 कि. मी. चा प्रवास करून सरहद्दीवर असलेल्या जयंतीपूर ठाण्यावर त्यांना नेण्यात आले. तेथे कल्याणी ग्रुप हेड क्वार्टर बटालियन क्र. 36 च्या अधिकार्‍यांकडे सर्व दहा बांगलादेशींचा ताबा देण्यात आला.