आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्य सपर्धेत सादर झालेल्या ‘हसरे दु:ख’ला उत्स्फूर्त दाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आपल्या निरागस करामतींनी सर्वांनाच हसविणार्‍या चार्ली चॅप्लिनच्या 36व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘हसरे दु:ख’ हे नाटक सादर करीत चिमुरड्यांनी चॅप्लिनच्या हसण्यामागचे दु:ख उलगडवले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या 11 व्या बालनाट्य स्पर्धेत सादर झालेल्या या नाटकाने उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली.
उत्तम रंगभूषा, चार्लीचे हुबेहुब रूप आणि तितक्याच चांगल्या अभिनयाद्वारे या नाटकाने आणि कलाकारांनीदेखील उपस्थित रसिकांची मने जिंकली. आर. एम. ग्रुपच्या या नाटकामध्ये तनिश वाघमारे, प्रशांत धात्रक, मंगेश परमार, सोहम महाजन, सुयोग परदेशी, स्वप्नज वाघ आदी कलाकारांनी चार्ली, सिडने आदींच्या भूमिका साकारल्या. नाटकाचे दिग्दर्शन व लेखन गणेश सरकटे यांचे होते, तर प्रकाशयोजना उदय माधव यांची होती. नेपथ्य सुनील परमार, उदय माधव यांचे होते. या नाटकाबरोबरच रंगमंचावर प्राणी-पक्षी, झाडे उभे करून ‘जंगल’ या नाटकाने रसिकांना जंगलविश्वाची सफर घडवली. प्रशांत वाघ यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. यानंतर अहमदनगर येथील पुष्पक कला अकादमीतर्फे ‘मधली सुटी’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातून लहानग्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला.
आज सादर होणारी नाटके
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या या बालनाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि. 26) ‘चंगतम’, ‘पंखातील आभाळ’, ‘रूळ्या’ आणि ‘अद्भुत बाग’ ही विविधांगी नाटके सादर होणार आहेत. रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चिमुकल्यांचे कसब
चिमुरड्यांचे पाठांतर, संवाद फेक आणि रंगमंचावरील सहज वावर तसेच, मध्येच होणार्‍या गडबडी या सर्व गोष्टींमुळे एकूणच ही स्पर्धा सहभागी झालेल्या या सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप काही शिकवणारी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि सुप्तगुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळाला असून, या उदयोन्मुख कलाकारांनी स्पर्धेत सादर केलेल्या कलाविष्कारातून याची जाणीव होते.