आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या बांधबंदिस्तीसाठी अाता बाळा नांदगावकरांना पाचारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या नाशिकच्या गडाची बांधबंदिस्ती करण्यासाठी माजी अामदार बाळा नांदगावकर यांना नाशिकला धाडले अाहे. नांदगावकर यांनी साेमवारी (दि. २६) सायंकाळी मनसेच्या नाराज नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करून निवडणुकीत पक्षाची कामगिरी उत्तम हाेण्यासाठी काय करता येईल, याचा अंदाज घेतला. दरम्यान, मंगळवारी नांदगावकर शहर कार्यकारिणीची बैठक घेणार अाहेत.

गेल्या दाेन वर्षांत मनसेच्या नाशिकमधील बालेकिल्ल्याला माेठी भगदाडे पडली असून, बरीच डागडुजी करूनही बुरूज ढासळणे बंद झालेले नाही. चार वर्षांपूर्वी मनसेचे ३९ नगरसेवक असताना अाता हीच संख्या जेमतेम वीसपर्यंत अाली अाहे. तत्कालीन पदाधिकारीही भाजप शिवसेनेत गेले असल्यामुळे मनसेला भरारी घेण्यात अडचणी येत अाहेत. त्यातच अाता महापालिका निवडणूक हा पक्षासाठी निर्णायक टप्पा मानला जात असून, त्यावर ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले अाहे.महापालिकेत विकासकामे करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे जादूची कांडी फिरवून लाट निर्माण करायची कशी, असाही प्रश्न अाहे. दुसरीकडे, निवडणुकीच्या ताेंडावर मनसेतील नाराज नगरसेवकांचा अाणखी एक गट फुटण्याची भीती असल्यामुळे बांधबंदिस्तीसाठी अाता नांदगावकर मैदानात उतरले अाहेत.

या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी साेमवारी नऊ-दहा नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा केली. त्यात प्रामुख्याने सभागृहनेता सुरेखा भाेसले, सुदाम काेंबडे, सुजाता डेरे, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, शशिकांत जाधव, डाॅ. विशाल घाेलप, गणेश चव्हाण यांच्याशी पहिल्या टप्प्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
संपर्कप्रमुखांवर अविश्वास
मनसेच्या संपर्कप्रमुखपदाची सूत्रे अविनाश अभ्यंकर यांच्याकडे असून, सुरुवातीला अभ्यंकर यांनी नाराजांना सक्रिय करून संघटनेत माेट बांधली हाेती. मात्र, मध्यंतरी नियुक्ती महापालिकेतील काही कंत्राटांबाबतच्या निर्णयावरून नगरसेवकांचा एक गट नाराज झाल्याचे सांगितले जाते. त्यातून त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वतंत्र तक्रारी करीत दखल घेण्याची मागणीही केली हाेती. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांच्याकडे नाशिकची सूत्रे साेपवल्याची चर्चा अाहे. दरम्यान मनसेतील सूत्रांच्या मते, अभ्यंकर यांच्याकडे नाशिकची सूत्रे कायम असून, दहा महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नांदगावकर यांच्यासह शिशिर शिंदे नितीन सरदेसाई यांच्याकडे जबाबदारी साेपवली अाहे. त्यामुळेच नांदगावकर यांनी बैठक घेतली. मात्र, एकप्रकारे अभ्यंकर यांच्यावर हा अविश्वासच मानला जात अाहे.

नगरसेवकांची मते जाणून घेणार
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी नाशिकला आलो आहे. या संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला आहे. संघटनेत कोणतेही फेरबदल झालेले नाहीत. - बाळा नांदगावकर, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

नगरसेवकांकडून तक्रारींचा पाऊस
नांदगावकर यांच्याकडे नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींत पक्षसंघटनेत विश्वासात घेणे, पदे देताना विचार करणे, पक्षाला दिलेली आर्थिक मदत परत मिळालेली नाही, अशा स्वरूपाच्या बहुतांशी तक्रारींचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...