आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे मंगळसूत्र विकले, पण अध्यापन सुरू ठेवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे प्राचार्य डी. डी. कुरणकर यांची लेखी तक्रार केल्यामुळे प्रशासन आता सूड उगवत असल्याचा आरोप मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापकांनी केला आहे. ऑगस्टपासून हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करण्यास मज्जाव करण्यात आला असून महिन्यांपासून विद्यापीठाने वेतन दिले नसल्याने सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहायक प्राध्यापक बी. डब्ल्यू. सोनवणे यांनी तर पत्नीचे मंगळसूत्र मोडले. काहींनी सोने गहाण ठेवून प्रपंच चालवलाय, अध्यापन मात्र सोडले नाही.
‘विद्यापीठ कॉलेजचे भ्रष्ट मॉडेल’ या शीर्षकाखाली सोमवारी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. कुलगुरूच कुरणकर यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला होता. त्यानंतर कुरणकरांवर राजीनाम्याची गच्छंती ओढवली. त्यामुळे मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापक कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने धारेवर धरण्यास सुरुवात केली. मंगळवारपासून १७ प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी हजेरीपटावर स्वाक्षरी करण्यास मज्जाव केला. आधीच कमी वेतन आणि त्यात तीन महिन्यांपासून विद्यापीठाने वेतनही दिलेले नाही. आता तर नोकरी जाण्याची भीती असल्याचे शिपाई सतीश ब्राह्मणे यांनी म्हटले आहे. तथापि, १६ एप्रिल २०१६ रोजी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी खंडपीठात धाव घेतली आहे. मे रोजी खंडपीठाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठात याचिका दाखल केल्यामुळे मे, जून जुलैचे वेतनच विद्यापीठाने दिले नसल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. प्राध्यापकांना दरमहा २४ हजार, लिपिकांना १२ हजार तर सेवकांना हजार रुपये वेतन निश्चित केले आहे. एकीकडे तुटपुंजे वेतन आणि दुसरीकडे तीन महिन्यांपासून खडकू नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

पदरमोडकरून प्रपंच : सोनवणेयांनी २७ जुलैला पत्नीचे मंगळसूत्र विकून आलेल्या २६ हजारांत ते कुटुंबाचा खर्च चालवत आहेत. अर्जुन साबळे यांनी १२ हजार रुपयांची अंगठी सोनाराकडे गहाण ठेवून चार हजार रुपये घेतले आहेत. त्याशिवाय शिपाई सतीश ब्राह्मणे यांनी पत्नीचे १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ‘झुंबर’ हजार रुपयांत गहाण ठेवले आहेत. सतरा जणही वेतन नसल्यामुळे पदरमोड करून प्रपंच चालवत आहेत. मात्र अध्यापन कार्य सोडले नाही. आता तर हजेरीपटावर स्वाक्षऱ्या थांबवल्यामुळे आमच्या त्यागाशी प्रशासनाला काही देणे-घेणे आहे की नाही, असा सवाल तिघांनीही उपस्थित केला आहे.

खूपच प्रॉब्लेम्स आहेत
^मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना मस्टरवर सह्या करण्यापासून आपणच रोखले आहे. तिथे प्राचार्य नाही, प्राध्यापकांना वेतन नाही, काही जण न्यायालयात गेलेले आहेत. असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. एकदा महाविद्यालयाला भेट देऊन सर्व जाणून घ्यावे लागणार आहे. बुधवारी कुलगुरू आल्यानंतर त्याविषयी निर्णय होईल. -डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी कुलसचिव

पदरमोड करताहेत
^मी पत्नीचे मंगळसूत्र मोडून प्रपंच चालवत आहे. अत्यंत दुर्गम भागात कुटुंबीयांसमवेत राहून नोकरी करतो आहोत. आमच्या कामाची प्रशासनाला अजिबात चिंता नाही. आता तर सह्या करण्यापासून रोखले आहे. कुलगुरूंकडे प्राचार्याच्या मनमानी कारभाराची तक्रार केल्यामुळे आता त्रास दिला जात आहे. -बी. डब्ल्यू. सोनवणे, सहायक प्राध्यापक, मॉडेल कॉलेज
बातम्या आणखी आहेत...