आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शहरात मिळणारी फळे कार्बाइडसारख्या घातक रसायनाने पिकवली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कमी अवधीत फळे पिकवण्याकरिता व्यापारी याचा वापर करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. मात्र, याकडे अन्न आणि औषध प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
सणासुदीच्या काळात विविध पूजा आणि प्रसादाकरिता फळांचा वापर करण्यात येतो. ही फळे ताजी आणि टवटवीत दिसण्याकरिता फळांना इथोनिल आणि कार्बाइड यांसारख्या घातक रसायनांद्वारे पिकवण्याची प्रक्रिया केली जात असल्याने अगदी मुबलक प्रमाणात ही फळे मिळत आहेत. कमी वेळेत जास्त फळांची विक्री करण्याकरिता व्यावसायिक हे घातक रसायन वापरत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. कारवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
असे आहे घातक रसायन
कार्बाइड आणि इथोनिल या रसायनांद्वारे आंबा, चिकू, पपई, केळी पिकवली जातात. कार्बाइडने चिकू आणि पपई पिकवली जाते, तर इथोनिलने केळी आणि आंबा.
अशी होते प्रक्रिया..
व्यापारी शेतकर्यांकडून कमी भावात कच्च्े चिकू, पपई आणि केळी खरेदी करतात. गुदामामध्ये क्रेटमध्ये कार्बाइडच्या पुड्या ठेवून ही फळे पिकवली जातात. ही प्रक्रिया सहा तासांत पूर्ण होते. केळीचे कच्चे घड खरेदी करून ते इथोनिलमध्ये बुडवल्या जातात. यानंतर काही तासांत हिरव्या असलेल्या केळी पिवळ्याधमक होतात.
काळजी घेणे गरजेचे
सफरचंद सोडले तर सर्वच फळे घातक रसायनांद्वारे पिकवली जातात. फळे खरेदी करताना ग्राहकांनी याबाबत काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. - डॉ. राजेंद्र भांबर
सर्वच देऊन-घेऊन चालते
कार्बाइडच्या साहाय्याने सर्रासपणे फळे पिकवणार्या शहरातील एका व्यापार्यास कारवाईबाबत विचारले असता, सर्व काही देऊन-घेऊन चालते. हा आजकालचा व्यवसाय नाही. अनेक दिवसांपासून तो सुरू आहे, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.