नाशिक- शहरातील 50 टक्के एटीएमवर सुरक्षारक्षक नसून, 60 टक्के केंद्रांत कॅमेरेच बसवलेले नाहीत. केवळ 30 टक्के एटीएमवर पारदर्शक काचा आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या तपासणीत हे धक्कादायक चित्र समोर आले. मुंबई व बंगळुरूमध्ये एटीएम फोडून झालेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी शहरातील एटीएमवर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करून पंधरवडा उलटूनही बँकांचे व्यवस्थापन त्याबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यातील मोठय़ा शहरांमध्ये एटीएम लुटीच्या घटना लक्षात घेता पोलिस यंत्रणा शहरात दक्षता घेत आहे. आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त गणेश शिंदे व हेमराजसिंग राजपूत यांनी बँका व्यवस्थापकांच्या बैठका घेत एटीएमवर 24 तास सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासह सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी बँकांच्या प्रतिनिधींनी त्यास संमती दर्शवत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या दोन दिवसांपासून वरिष्ठ अधिकार्यांनी एटीएमची पाहणी केली. बुधवारी सकाळपासूनच उपआयुक्त डॉ. स्वामी, राजपूत आणि वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे, कोंडिराम पोफेरे यांनी पथकासह स्वत: तपासणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
शहरात आहेत 475 एटीएम
परिमंडळ एकमधील गंगापूररोड, कॉलेजरोड, आनंदवल्ली, अशोक स्तंभ, सीबीएस, पंचवटी, जुने नाशिक या क्षेत्रामध्ये किमान 225 एटीएम आहेत. तर परिमंडळ दोनच्या सिडको, सातपूर, उपनगर , नाशिकरोड, इंदिरानगर या भागात 250 एटीएम आहेत.
एटीएम सुरक्षेची अवस्था
> सिडकोमधील त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, पवननगर, राणेनगर भागातील एटीएममध्ये सुरक्षारक्षक अनुपस्थित.
> अनेक एटीएमना आतमध्ये आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
> काचेच्या दरवाजावर पूर्णपणे स्टिकर, जाहिराती चिकटवलेल्या आढळल्या.
> बहुतांश कॅमेरे बंद. अनेकांवर रंग दिलेला तर कुठे कॅमेर्यांच्या वायर निघालेल्या.
> शटरला कुलूप नसताना ते वर ओढलेले आढळले, ही बाब धोकादायक.
असे असावे आदर्श एटीएम
> एटीएमच्या मधील सर्व व बाहेरचा किमान 200 मीटरचा परिसर चित्रित होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे.
> सीसीटीव्ही कॅमेर्यांची नियमित तपासणी.
> एटीएम केबिनच्या काचा व दरवाजे जाहिरातींविना.
> काच पारदर्शक असावी.
> मशीनवर रिअर व्ह्यू मिरर बसवावा, जेणेकरून पैसे काढणार्यामागे कोणी असल्यास त्याचा चेहरा टिपला जावा.
> सुरक्षारक्षक व त्याच्या हत्यार परवान्याची नावानिशी नोंद.
> एटीएमचे शटर उघडल्यानंतर वर केल्यावर कुलूप लावावे.
> सिक्युरिटी अलार्मची काळजी घ्यावी.
> एटीएम केंद्रावर हेल्पलाइन, नियंत्रण कक्ष व संबंधित पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ठळक स्वरूपात.
> सुरक्षारक्षकाने कुलूप लावूनच बाहेर पडावे.
> सर्व ठिकाणी सुरक्षारक्षक 24 तास हजर असावेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नाशिकमधील एटीएमची बोलकी छायाचित्रे...