आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LIVE रिपोर्ट: एटीएम: एनी टाइम मारा डल्ला; सुरक्षा रामभरोसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोतील त्रिमूर्ती पोलिस चौकीनजीक आयसीसीआय बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर शहर व परिसरातील एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एटीएम केंद्रांना भेटी दिल्या असता बहुतांशी बॅँकाच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी दिवसा तर सुरक्षारक्षक असतात पण रात्री एटीएम वा-यावरच असल्याचे सुरक्षारक्षकांकडूनच सांगण्यात आले.

शहरात राष्ट्रीयीकृत बॅँका, खासगी, सहकारी बॅँकांचे हजाराच्या घरात एटीएम केंद्र आहेत. काही एटीएमच्या आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली. यामध्ये सिडकोतील त्रिमूर्ती चौकीसह पवननगर, अंबड लिंक रस्त्यावरील व मायको सर्कल ते चांडक सर्कल, कुटे मार्ग ते संदीप हॉटेल, गडकरी चौक, जिल्हा परिषद
कार्यालयासमोर, महात्मा गांधीमार्ग, मुंबई नाका भागातील एटीएमचा समावेश आहे. यात, केवळ ज्या बॅँकांच्या शाखेला जोडून असलेल्या एटीएमवरच सुरक्षारक्षक आढळून आले. उर्वरित बहुतांशी एटीएम केंद्रावर सकाळी आणि सायंकाळी काही तास सुरक्षारक्षक राहत असल्याचे दिसून आले; तर काही ठिकाणी केवळ मशीनमध्ये नोटांचा भरणा करण्याच्या वेळीच सुरक्षारक्षक नजरेस पडत असल्याचे तसेच रात्री हे एटीएम रामभरोसेच परिसरातील रहिवासी, व्यापार्‍यांनी सांगितले. पोलिसांकडून प्रत्येक केंद्रावर सुरक्षारक्षक नियुक्त करणे अशक्य असल्याचे सांगत बॅँकांनी सुरक्षारक्षक नियुक्त करावे असे पत्र सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

सिडकोतील जे एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न झाला, त्याठिकाणी रात्री सुरक्षारक्षकच नसल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात, ज्या त्रिमूर्ती चौकातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, त्याच पोलिसांकडून या एटीएमवर सुरक्षारक्षक नियुक्तीबाबत संबंधितांना पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडल्याचे सांगितले.

सुरक्षारक्षकाविना ग्राहकांची गैरसोय
शहरातील बहुतांशी एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, प्रवेशद्वारावर कार्ड टाकल्यानंतरच दरवाजा उघडून प्रवेश मिळतो. मात्र, याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने दिवसभरात किमान 100 हून अधिक ग्राहकांना कार्ड टाकताना चुका होत असल्याने दरवाजा उघडत नसल्याने मनस्ताप होतो. किमान सुरक्षारक्षक असल्यास तो मदत करतो. परंतु, याठिकाणी कुठल्याही सूचनांचा फलक नसल्याने आजूबाजूच्या दुकानदारांना अथवा नागरिकांना विचारून दरवाजा उघडावा लागतो. त्यामुळे किमान प्रत्येक केंद्राच्या बाहेर कार्ड टाकण्याची पद्धत फलकावर प्रात्यक्षिकासह प्रसिद्ध करण्याची ग्राहकांनी मागणी केली. तसेच, या केंद्रावर रात्रीच्या वेळी बाहेर दिवे बंद असतात. तसेच काही केंद्रांवर सायरन बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याच्य वायरच तुटलेल्या आहेत.

बॅँकांच्या निष्काळजीपणाने चोरीचा प्रयत्न
एटीएमची सुविधा देणाºया बॅँकाना सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे वारंवार लेखी कळविण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने असे चोरीचे प्रयत्न होतात. चोरट्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी पैसे चोरी होऊ शकत नसल्याचे बॅँकांना माहीत असल्यामुळे ते दुर्लक्ष करीत असले, तरी एटीमएम मशीनचे नुकसान होऊन परिसरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण होते. प्रत्येक केंद्रावर पोलिस नियुक्त करणे शक्य नाही.
-संदीप दिवाण, पोलिस उपायुक्त

गस्त नावालाच
सिडकोत पोलिस चौकीलगत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे ज्यावेळी उघडकीस आले, त्यापूर्वी काही मिनिटे अगोदरच बीट मार्शलने गस्त घातल्याचे सांगण्यात आले. तसेच, याठिकाणी दोन दिवसांपूर्वी रात्रीच ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसूनही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा न लागल्याने गस्त नावालाच असल्याचे दिसून आले.

बॅँकांनी सुरक्षारक्षक नेमावे
कुटे मार्गावर एका खासगी बॅँकेचे एटीएम केंद्र असून याठिकाणी कार्ड स्वॅप केल्याशिवाय प्रवेशद्वार उघडत नाही. दिवसभरात 200हून अधिक ग्राहकांना त्यांचे कार्ड टाकून उघडून द्यावे लागते. इतकेच नव्हे, तर त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देतच वेळ जाऊन त्यांच्याबरोबर आपल्यालाही मनस्ताप होतो. येथे सुरक्षारक्षक नियुक्त करावे.
-जुनेद शेख, नागरिक, कुटे मार्ग