येवला - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंदरसूल येथील शाखेत रिक्षातून नेण्यात येत असलेल्या पन्नास लाखांच्या रकमेवर मंगळवारी भरदिवसा दरोडा पडला. पल्सरवरील दोघांनी रिक्षातील तिघांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत ही रक्कम लुटून नेली. घटनेनंतर काही मिनिटांतच तालुका पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमांसह आडवाटेच्या सीमांचीही नाकेबंदी केली आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील अंगुलगाव येथे गेल्या अकरा दिवसांतील सहावा दरोडा पडण्यास १२ तास उलटत नाही तोच ही घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या चार दिवसांच्या सलग सुट्यांनंतर आज बँकांचे व्यवहार सुरळीत होताच दरोडेखोरांनी बँकांच्या रकमेवरच दरोडा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या खरीप हंगामातील पीककर्जांचे वाटप विविध सहकारी संस्थांमार्फत केले जात असल्याने अंदरसूल येथील बँकेच्या शाखेत ५० लाख रुपयांची रक्कम अंदरसूल येथील बँकेचे शाखाधिकारी रामदास महाले, शिपाई लहानू भारती हे रिक्षातून घेऊन जात होते. जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड या मुख्य शाखेकडे महाले यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु, लक्ष्मीनारायण रस्त्यावरील बँकेच्या शाखेत ५० लाख रुपयेच शिल्लक असल्याने अंदरसूल शाखेला ५० लाख रुपये अदा करण्यात आले.
मंगळवारी दुपारी वाजता महाले यांनी ही रक्कम नेण्यासाठी भाड्याची अॅपे रिक्षा ठरवली. यानंतर ही रक्कम बारदानाच्या गोणीत भरून महाले भारती रिक्षाचालक अमोल वाकचाैरेसह निघाले. येवला- अंदरसूल रस्त्यावरील गाडे पेट्रोलपंपासमोर रिक्षा येताच पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून येणार्या दोन अज्ञात चोरट्यांनी डाव साधला.
मोटारसायकलवर मागे बसलेल्या चोरट्याने रिक्षाचालक वाकचौरे, महाले भारती यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली. अचानक घडलेल्या या घटनेत रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली आणि मोटरसायकलवरील चोरट्यांनी ५० लाख रुपयांच्या नोटा असलेले पोते घेऊन औरंगाबादच्या दिशेने पोबारा केला.
केंद्रीय शाखेसाठीच सुरक्षा
शाखांचे मुख्यालयापासूनचे असलेले अंतर विचारात घेऊन कॅश घेऊन जाण्यासाठी वाहनभाडे ठरवून देण्यात आले आहे. केवळ केंद्रीय शाखेपर्यंतच पेमेंट घेऊन जाण्यासाठी िजल्हा बँकेकडे सुरक्षा वाहन सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले जाते. सुभाष देसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक
सीमांची नाकाबंदी
पोलिसांनी औरंगाबाद, नगर, जळगाव, धुळे जिल्ह्यातील सीमांची नाकाबंदी केली. आडवाटांचीही नाकाबंदी करण्यात आली. गवंडगाव शिवारातील टोलनाक्यावरील सीसीटीव्हीवरील फुटेजही तपासले; मात्र यातून काहीही मिळू शकले नाही.
बैठकीतच बातमी
तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री अंगुलगाव येथे पडलेल्या दरोड्यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक नरेश मेघराजानी हे मनमाड, चांदवड, नांदगाव, वडनेरभैरव येवला येथील पोलिस निरीक्षकांची बैठक घेत असतानाच या दरोड्याची वार्ता आली.
चोरट्यांचे वर्णन नाही
अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा टाकलेल्या दरोड्यानंतर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी केली आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, चाळीसगावसह नगर, औरंगाबादच्या पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मिरचीची पूड टाकल्याने पल्सरचा क्रमांक चेहरे झाकलेल्या चोरट्यांचे वर्णन फिर्यादी करू शकले नाहीत. नरेशमेघराजानी, पोलिस
बँकांचा भोंगळ कारभार
शहर तालुक्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमधून कॅश काढून नेत असतानाही ग्राहकांसह बँकेच्या कर्मचार्यांवर दरोडे घालण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही बँकांचा भाेंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. वारंवार घडणार्या या घटनांनंतर पोलिसांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार राष्ट्रीयीकृत खासगी बँका, पतसंस्थांना सुरक्षेसंदर्भात लेखी पत्र दिले आहेत.
अपर अधीक्षकांची भेट
मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने तसेच पोलिस उपअधीक्षक मेघराजानी यांनी घटनास्थळासह बँकेत येऊन संबंधितांची चौकशी केली.