आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुद्रा’साठी बँकांची मनमानी अन‌् फुकाचे सल्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुचर्चित मुद्रा योजनेसाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबविले जाणार असले, तरी अनेक बँका कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण झाल्याने इतर बँकांत जाण्याचा सल्ला देत मनमानी करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मूळ उद्देशच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसेच छोट्या व्यवसायांच्या विस्तारासाठी मुद्रा कर्ज खात्यांतर्गत सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, मोहिमेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह बँकांची बैठक होणार आहे. कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करून व्यवसाय वाढवू शकतील, अशा लाभार्थ्यांची निवड या अभियानातून केली जाणार आहे. मात्र, अभियान सुरू होण्यापूर्वीच हे लक्ष्य बँकांनी कसे पूर्ण केले, असा प्रश्न रोजगार सुरू करायची इच्छा असलेल्या तरुणांना पडला आहे.
कर्जासाठी अर्जदाराला बँकेच्या कोणत्याही शाखेत केवळ एक अर्ज भरून द्यावा लागेल. अर्जानंतर बँक या अर्जदाराचा व्यवसाय, त्याची गरज, कर्ज परत करण्याची क्षमता या बाबींचा सर्वंकष विचार करून त्याला कर्ज उपलब्ध करून देईल. यामुळे खऱ्या अर्थाने सूक्ष्म लघुउद्योगांना बळ मिळणार आहे. बँकांच्या प्रत्येक शाखेवर २५ मुद्रा कर्ज‌खात्यांची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. प्राप्त होत असलेल्या तक्रारींबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.